(रत्नागिरी)
दरवर्षी विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन कमी करण्यावर चर्चा होते. दप्तराचे वजन किती हवे, हे सरकारने ठरवले आहे. सर्व वर्गातील मुलांचे दप्तराचे ओझे त्यांच्या शारीरिक वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी असावे. दप्तरामध्ये काय असावे आणि काय नसावे हेसुद्धा सरकारने सांगितलेय. त्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागस्तरावरूनही विद्यार्थ्यांसाठी आता ‘पॉलिमर दप्तरालय’ शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रायोगिक टप्प्यात जिल्ह्यातील 170 हून अधिक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे.
जून महिना आला, की पालक, सरकार, शाळा आणि प्रसिद्धी माध्यमांत दप्तराच्या वाढत्या ओझ्याची जोरदार चर्चा सुरू होते. राज्यातील 10-12 वर्षांखालील तब्बल 70 ते 75 टक्के मुलांना दप्तराच्या ओझ्यामुळे आजार होत असल्याचे धक्कादायक निरीक्षण सरकारने नेमलेल्या समितीने नोंदवले आहे. शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन हे साधारणपणे त्यांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असा संकेत असताना प्रत्यक्षात दप्तराचे वजन 20 ते 30 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले. 10-12 वर्षांखालील तब्बल 70 ते 75 टक्के मुलांना या ओझ्यामुळे आजार होत असल्याचे धक्कादायक निरीक्षण राज्य सरकारने नेमलेल्या समितीने यापूर्वीच नोंदवले आहे. खरं तर ही समस्या ग्रामीणपेक्षा शहरी विद्यार्थ्यांमध्ये जास्त आहे. त्यातही राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त दुसऱया शैक्षणिक बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवणाऱया शाळांच्या विद्यार्थ्यांना ती जास्त भेडसावते.
विद्यार्थ्यांच्या दप्तरांतील विविध वस्तू आणि त्याच्या ओझ्यामुळे होणारे आजार पाहता चिमुकल्या विद्यार्थ्यांना सत्रनिहाय वह्या-पुस्तके वापरणे, सर्व विषयांसाठी सत्रनिहाय एकच पुस्तक वापरणे शाळेत लॉकर्सची व्यवस्था करणे, विशिष्ट दिवसांत विशिष्ट विषयच शिकवणे, असे काही उपाय करता येईल का यावरही मागील काळात उपाय सूचवण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन जास्त होण्याची कारणे काय यापेक्षा त्यावर उपाय काय यावर झालेल्या अभ्यासानंतर शासनस्तरावरून शाळेत ग्रंथालयासारखे ‘दप्तरालय’ सुरू करावे अशी सूचना करण्यात आली.
यात इयत्तानिहाय आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य विद्यार्थीनिहाय उपलब्ध करण्याची आवश्यक नोंदीसह व्यवस्था करता येईल. त्यासाठी कपाट किंवा रॅकची व्यवस्था करावी. मुख्याध्यापकांनी वेळापत्रक बनवताना एकूण तासिकांमध्ये जास्तीत जास्त विषय घेणे टाळावे. त्याऐवजी ‘कमी विषय, जास्त तासिका’ या सूत्राने वेळापत्रक बनवावे. म्हणजे एकाच विषयाचे त्या दिवशी दोन तास करणे म्हणजे रोज रोज ती पुस्तक आणायची गरज पडणार नाही असेही सूचविण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागस्तरावरून जि.प.शाळांतील विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आता हा उपकम हाती घेण्याची पावले उचलण्यात आली आहेत. सन 2021-22 जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ‘पॉलिमर दप्तरालय’ उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात येउन त्याला मंजूरीही देण्यात आली आहे. त्यासाठी 2 कोटी इतकी अंदाजपत्रकीय रक्कम आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘पॉलिमर दप्तरालय’ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रायोगिक टप्प्यात 170 अधिक शाळांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांनी सांगितले. त्यासाठी शाळांमध्ये त्यासाठी आवश्यक लॉकरसारखी सुविधा उपलब्ध होणार आहे.