(मुंबई)
अनैतिक संबंधाच्या संशयातून लहान भावानेच मोठ्या भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर येथील शहाड भागातील एका कॉलनीमध्ये घडली आहे. या घटनेने कुटुंबासह संपूर्ण परिसरात खळबळ माजलीअसून दोन संसार उद्ध्वस्त झाले आहेत. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सख्ख्या भावावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खून प्रकरणामध्ये अमित गांगुर्डे (वय २६) याला अटक केली असून रोहित गांगुर्डे (वय २८) असे निर्घृणपणे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत आणि आरोपी हे अंबरनाथ शहरात एकत्र राहत असून दोघेही सख्खे भाऊ आहेत आणि दोघांचा विवाह झाला आहे. मृत मोठा भाऊ रोहित हा आरोपी लहान भावाच्या पत्नीशी जवळीक साधून होता. त्यातच काही दिवसांपूर्वी या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत मृतकाच्या पत्नीने पाहिले होते. तेव्हापासूनच दोघा भावात वाद सुरु झाले. त्यानंतर काही नातेवाईकांनी मध्यस्थी करत प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही मृत मोठ्या भावाने चोरीछुपे भावाच्या पत्नीसोबत जवळीक सुरुच ठेवली होती. हे त्याच्या आरोपी भावाला समजले होते.
दरम्यान आजीच्या घरात आरोपी अमित आणि रोहित दोघे भाऊ आले असताना या दोन भावांमध्ये जोरदार भांडण झाले. भांडण झाल्यानंतर रोहित आजीच्या घरात झोपला होता. यावेळी आरोपी भाऊ अमितने घरातील दगडी पाटा थेट झोपलेल्या रोहितच्या डोक्यात मारून त्याला जागीच ठार केले.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी तात्काळ भेट देत पंचनामा करत रोहितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रवाना केला. पोलिसांनी आरोपी अमित याला ताब्यात घेतले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून अमितला अटक केली आहे.