(संगमेश्वर /प्रतिनिधी)
मोठा गाजावाजा करत मुंबई-मडगाव या कोकण रेल्वे मार्गावर ‘वंदे भारत’ ही सुपरफास्ट गाडी सुरू केली असली तरी त्या गाडीचा सर्वसामान्य चाकरमानी कोकण रेल्वे प्रवाशांना काहीही फायदा नाही. केवळ गोव्याला पर्यटनासाठी जाणार्या धनाढ्य प्रवाशांसाठीच ही गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे, हे स्पष्ट झाले आहे.
या गाडीमुळे कोकणात जाणार्या इतर गाड्यांचे वेळापत्रक ढासळले आहेच, शिवाय मोजकेच थांबे दिल्यामुळे इतर स्थानकांवर जाणार्या कोकणवासी प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. अव्वाच्या सव्वा भाडे असणार्या या गाडीला पुढे जाण्यासाठी नियमित धावणाऱ्या इतर गाड्यांना साईडलाईनला थांबावे लागते. परिणामी सर्वच गाड्यांना उशीर होतो. जनशताब्दी, नागपूर-मडगाव एक्स्प्रेस, तेजस एक्सप्रेस आणि हीच परतीची तेजस एक्स्प्रेस ‘वंदे भारत’ गाडीमुळे उशिराने धावताना दिसत आहेत. म्हणजेच ‘वंदे भारत’ गाडीच्या सुसाट वेगासाठी गरीब चाकरमानी कोकणवासी रेल्वे प्रवाशांच्या स्वप्नांना तिलांजली देण्यात आली असून, ती स्वप्नं आता ‘वंदे भारत’च्या वेगवान चाकाखाली चिरडली गेली आहेत, असा संताप ‘निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक समुहा’चे प्रमुख पत्रकार संदेश सुरेश जिमन यांनी व्यक्त केला आहे.
गेली चार-पाच वर्षे सातत्याने कोकण रेल्वेकडे नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसला संगमेश्वर रोड रेल्वे थांबा मिळावा म्हणून या समूहातर्फे आंदोलने, मागण्या, उपोषणे, पत्रव्यवहार, भेटीगाठी या माध्यमातून आवाज उठवला गेला. परंतु कोकण रेल्वे प्रशासनाने वेगवेगळी कारणे देत वेळकाढूपणा दाखवत, या सगळ्या मागण्यांना केराची टोपली दाखविल्याची खंत जिमन यांनी बोलून दाखवली. एप्रिल-मे महिन्यातील सुट्टी, होळी, गणेशोत्सव आदी काळात या ठिकाणी कोकण रेल्वेचे प्रवासी अधिक प्रमाणात वाढतात. वास्तविक संगमेश्वर रोड स्थानकातून कोकण रेल्वेला वर्षाला 4 कोटी 95 लाख एवढे विक्रमी उत्पन्न मिळत आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असणार्या या परिसरात दोन्ही गाड्या थांबल्या तर अधिक उत्पन्न मिळेल. कारण संगमेश्वर तालुक्यातील 196 गावांचा विचार केला तर हजारो प्रवासी नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसने प्रवास करू इच्छितात. त्यांच्या सुविधांचा आणि आपल्या वाढत्या उत्पन्नाचाही विचार प्रशासनाने केला पाहिजे.
‘वंदे भारत’ ही अति जलद गाडी असल्याने तिला कमी थांबे दिल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले असले, तरी या गाडीमुळे इतर गाड्यांचा विलंब सर्वसामान्य प्रवाशाला सहन करावा लागत आहे. अनेक जण उत्साहाच्या भरात वंदे भारत गाडीसोबत फोटो काढण्यात धन्यता मानतात. परंतु वस्तुस्थिती कोणी लक्षात घेत नाहीत. नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाड्या संगमेश्वर रोड स्थानकावर थांबल्यास इतर गाड्यांचे 15 ते 20 मिनिटांचे वेळापत्रक विस्कळीत होत असल्याचे तुणतुणं कोकण रेल्वे *प्रशासन नेहमीच वाजवत आले आहे. मग आता ‘वंदे भारत’मुळे सर्वच गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित झाल्याचे प्रशासनाला दिसत नाही का? असा सवाल जिमन यांनी व्यक्त केला.
‘वंदे भारत’चा सर्वांना अभिमान आणि आनंद आहे, पण तिच्यामुळे इतर गाड्यांवर आणि महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर उतरणार्या प्रवाशांवर कळत-नकळत अन्याय केला जात आहे. ज्या कोकण रेल्वेच्या उभारणीत इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राचा सर्वाधिक आर्थिक सहभाग होता, म्हणजे 50 टक्क्यांतील 22 टक्के आणि राज्यातील या स्थानकासाठी फक्त 3 आहेत. मात्र केरळसाठी 23, गोवासाठी 11, कर्नाटकसाठी आणि तामिळनाडूसाठी 6 गाड्या आहेत. प्रवाशांचा कोटा कमी असल्याची तकलादू कारणे सांगून कोकण रेल्वे स्थानिकांवर प्रचंड अन्याय करत आहे, हे तर या संख्येतून स्पष्टच दिसते.
कोकण रेल्वेच्या प्रगतीला साथ देण्यासाठी आणि निसर्गरम्य कोकणाच्या विकासासाठी आपला समूह कायम कटिबद्ध असल्याची ग्वाही देऊन, वंदे भारतसाठी वेगळा न्याय आणि संगमेश्वर स्थानकासाठी मात्र अन्याय, असा दुजाभाव न दाखवता, सर्वांगीण सुविधेसाठी पावलं उचलावीत, असे आवाहन संदेश जिमन यांनी कोकण रेल्वेला केले आहे. लवकरात लवकर आपल्या मागण्या मान्य न झाल्यास, प्रखर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही जिमन यांनी दिला आहे.