(कोल्हापूर)
कोल्हापूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या दांपत्याने आपल्या चुलत भावाला आपले लोकेशन पाठवून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. करवीर तालुक्यातील इस्पुर्ली येथील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. राहुल राजाराम परीट (वय 23) आणि अनुष्का राहुल परीट (वय-21) असे मृत दांपत्याचे नाव आहे.
राहुल परीट आणि अनुष्का कांबळे या दोघांचे जानेवारी महिन्यात वाघापूर येथे आंतरजातीय प्रेमविवाह संपन्न झाला होता. या विवाहाला घरच्यांनी देखील मान्यता दिली होती. तर राहुल परीट याची काही दिवसांपूर्वीच कागल तालुक्यातील सावर्डे या गावात महावितरणमध्ये वायरमन म्हणून बदली झाली होती. अनुष्का ही कोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात शिक्षण घेत होती. काल बुधवारी सकाळी अनुष्काला कॉलेजला सोडून कामावर जातो असे सांगत दोघेही व्हनगुत्ती येथून घराबाहेर पडले. रात्री दहा वाजता आपण कोल्हापुरातच थांबणार असल्याचे सांगितले. सकाळी साडेनऊच्या सुमारास राहुलने आपल्या वडिलांना घरी येत असल्याचे सांगितले. यानंतर तो मित्रासोबत सोशल मीडियावर चॅटिंग करत होता. दरम्यान त्याने आपल्या चुलत भावाला इस्पुर्ली येथील लोकेशन पाठवले आणि फोन बंद केला. तर बराच वेळ झाला तो घरी आला नाही, यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्याला फोन लावले असता त्याचा फोन लागला नाही.
यानंतर त्यांच्या घरच्यांनी राहुलने पाठवलेल्या लोकेशनच्या आधारे शोध घेतला असता इस्पुरली येथे एका शेतात पत्र्याच्या शेड जवळ राहुलची मोटरसायकल सापडली. शेडमध्ये गेले असता दोघांनीही ओढणी आणि साडीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. यावेळी नातेवाईकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या दोघांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.