( नवी दिल्ली / मुंबई )
संसदेच्या विशेष अधिवेशन सुरू असून, यामध्ये महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाले होते. त्यानंतर काल (21 सप्टेंबर) रोजी राज्यसभेतही या विधेयकांवर चर्चा झाली. तर रात्री उशिरा दहा वाजता विधेयकासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती होती. यावेळी विधेयकाच्या बाजुने सर्व मते पडली तर विरोधात शून्य मते पडली. त्यामुळे आता हो विधेयक कायद्यासाठी राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी जाणार आहे. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या अध्यक्षतेखाली स्लिपद्वारे मतदान प्रक्रिया पार पडली.
महिला आरक्षण विधेयक म्हणजेच नारी शक्ती वंदन विधेयक बुधवारी प्रदीर्घ चर्चेनंतर लोकसभेत एक तृतीयांश बहुमताने मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या समर्थनार्थ 454 आणि विरोधात 2 मते पडली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली स्लिपद्वारे मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज गुरुवारी राज्यसभेत मांडले गेले. त्यावर दिवसभर चर्चा झाली. यावेळी सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी टीका केली. मात्र, रात्री उशिरा दहा वाजता दरम्यान राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी मतदान प्रक्रियेला सुरुवात केली. यावेळी विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. आता हे विधेयक पास झाल्यामुळे ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवले जाणार आहे.
राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने 215 मते
लोकसभेपाठोपाठ आता राज्यसभेतही महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. सभागृहाने नारी शक्ती वंदन कायदा एकमताने मंजूर केला. विधेयकाच्या बाजूने 215 मते पडली. कोणत्याही खासदार किंवा पक्षाने या विधेयकाला विरोध केला नाही. विधेयक मंजूर झाल्यानंतर अध्यक्ष धनखर म्हणाले की, हिंदू परंपरेनुसार आज पंतप्रधान मोदींचा वाढदिवस आहे हा आनंदाचा योगायोग आहे. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.
33 टक्के आरक्षणाची तरतूद
महिला आरक्षण विधेयक म्हणजेच नारी शक्ती वंदन अधिनियम नुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू केले जाईल. लोकसभेच्या 543 जागांपैकी 181 जागा महिलांसाठी राखीव असतील. हे आरक्षण 15 वर्षे टिकेल. यानंतर संसदेची इच्छा असल्यास ती मुदत वाढवू शकते. हे आरक्षण थेट निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना लागू असेल. म्हणजेच ते राज्यसभा आणि राज्यांच्या विधानपरिषदांना लागू होणार नाही.
मुख्यमंत्र्यांनी केले प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या धाडसी निर्णयाचे स्वागत
महिलांना आरक्षण देणारे नारीशक्ती विधेयक सर्वसंमतीने राज्यसभेत मंजूर झाले. हा क्षण महिलांसाठी गौरवाचा क्षण असून देशाच्या इतिहासात सुवर्णक्षराने लिहीला जाणार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विधेयकाचे स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज महिला विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहे. या कायद्यामुळे त्यांना राजकीय क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. हा निर्णय देशासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजींच्या दूरदृष्टी आणि धाडसी निर्णय क्षमतेमुळे हा निर्णय होऊ शकला आहे. हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल प्रधानमंत्री मोदीजींचे अभिनंदन करतो. आमच्या शासनाने ही प्रधानमंत्री मोदीजींच्या प्रेरणेतून नमो महिला सक्षमीकरण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिलांना विविध शासकीय योजनांचे लाभ दिले जाणार आहेत.