( चिपळूण )
चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्यावतीने आजपासून चार दिवस (5 ते 8 फेब्रुवारी 2023) चिपळुणातील श्रीजुना कालभैरव मंदिर ट्रस्ट अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानात सुरु होणाऱ्या ‘पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्य` महोत्सवाच्या पहिल्या दिवशी लोककट्ट्यावर पिंपळीतील जाखडी खास आकर्षण ठरले, तर लोककलांमध्ये असगोलीतील संकासूर, ओमळीतील गोंधळ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गज्जो नृत्य लक्ष्यवेधी ठरले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती देशपांडे यांनी केल
यानंतर सायंकाळी सात वाजता खऱ्या अर्थाने लोककला सादरीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीलाच खास कोकणी पद्धतीने योगेश बांडागळे यांनी गाऱ्हाणे घालून या लोककलांना सुरुवात केली. यानंतर ओंबळीतील गोंधळ सादर झाला. शाहीर शंकर यादव यांचा भारदस्त आवाज, वाद्यांचा खणखणाट, तूणतुण्याची तनतून यामुळे या गोंधळाने लोककला महोत्सवामध्ये जाण आणली. सर्वांनीच या गोंधळाला दाद दिली. गोंधळ सादर करताना, त्या मागचा इतिहास, त्याची माहितीही शंकर यादव यांनी दिली.
यानंतर गुहागरमधील श्री भैरी व्याघ्रांबरी नमन मंडळ, असगोलीन संकासूर, गोमू नृत्यू सादर केले. काटखेळ व संकासूर पाहाताना सर्वांना शिमगोत्सवाची आठवण झाली. यानंतर डीबीजे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल वादन सादर केले. यालाही रसिकांनी उस्फूर्त दाद दिली. यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवजीवन मित्र मंडळाने गज्जा नृत्य सादर केले. कळसुळी पाहाताना प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. नेहा सोहन आणि त्यांच्या सहकारी महिलांनी उखाण्यातून उपस्थितांचे मनोरंजन केले.
रत्नागिरीतील तरवळ माचीवलेवाडी येथील श्री गणेश मित्र मंडळाचे सापाडही असेच वैशिष्ट्यपूर्ण ठरले. लोककला सारीकरणाच्या पहिल्या दिवसाचा समारोप रत्नागिरी सडे येथील सुकाई देवी प्रासादिक नमन मंडळाच्या नमन आणि रावण सादरीकरणाने झाला. दशमुखी रावणाचे नृत्य पाहाताना रसिक देहभान विसरुन गेले होते. अंजली बर्वे, मनीषा दामले, दिलीप आंब्रे, कैसर देसाई, लोककला विभागाचे प्रमुख प्रा. संतोष गोणबरे, प्राची जोशी शिवाजी शिंदे, प्रकाश गांधी आदींनी नियोजनाची जबाबदारी उत्तमपणे सांभाळली.
*कार्यक्रम*
मंगळवारी (दि. 7 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजता रत्नभूमीतील लोककला (सहभाग माधव भांडारी, बाबू घाडीगावकर, रमेश सावंत, दुर्गेश आखाडे, अमित ओक) आणि पावणेबारा वाजता लोककला आणि स्त्री अभिव्यक्ती (सहभाग डॉ. सूर्यकांत आजगांवकर, डॉ. गोविंद काजरेकर, डॉ. निधी पटवर्धन, रूपाली अणेराव, अमोल पालये) हे दोन परिसंवाद होतील. सायंकाळी 6 वाजता देवाला गाऱ्हाणे (सचिन काळे, ता. रत्नागिरी), काटखेळ (श्री चंडिकादेवी मंदिर, खेर्डी, ता. दापोली), गौरी टिपरी व गोफ नृत्य (राधाकृष्ण महिला मंडळ, फणसवळे, ता. रत्नागिरी), म्हणी आणि शिव्या (सुनील बेंडखळे, सचिन काळे, ता. रत्नागिरी), पोवाडा (प्रदीप मोहिते आणि सहकारी, ओमळी, ता. चिपळूण), नकटा (निवबाळ विकास मंडळ, येसरेवाडी, ता. दापोली), कोळी नृत्य (दुर्वास पायकोळी, नामदेव खामकर आणि सहकारी, श्रीवर्धन, जि. रायगड), डेरा (कासारवाडी डेरा खेळ, ता. दापोली), होळी पालखी नृत्य (देवी पद्मावती पालखी नृत्य मंडळ, मार्गताम्हणे, ता. चिपळूण) या कला सादर होतील.