(रत्नागिरी)
‘बा म्हाराजा साहित्यपुरषा, जनसेवावाल्यांनी साहित्याची गुढी उभारलीली हाय… पुस्तकांची पुंजा मांडलीली हाय… साहित्यपुरषांच्या सानंवर आज उबं र्हावनं गार्हानं घालतावं हाय… बा म्हाराजा साहित्यपुरूषा, वाचनार्याला ढिगभर वाचयाची वानशा देस… लिवनार्याच्या हातात ताकत देस… बोलनार्याच्या तोंडारं सरस्वती नाचानं दे… लिवनार्याच्या लेकनेत साहित्याचो गोडवो दिसानं दे… इचारांचो तडको उडानं दे… नाविन्याचो ध्यास लागानं दे… प्रतिभेची साथ मिलानं दे… लिवनार्यांची वंशवेल फलानं दे.. फुलानं दे… असा सगला मंगल करून रत्नागिरीच्या साहित्याचा झेंडा जगबर मिरानं दे रं साहित्यपुरषा म्हाराजा..’ असे खणखणीत गार्हाणे जनसेवा ग्रंथालयातर्फे उभारण्यात आलेल्या ‘साहित्यिक गुढी’ला घालण्यात आले. रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात, मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्यिक गुढीचा कार्यक्रम पार पडला.
कोरोनानंतर वाचसंस्कृतीला आलेली मरगळ दूर होऊन ती वाढीस लागावी, साहित्य विश्वात नवनव्या, सकस साहित्याची निर्मिती व्हावी, या उद्देशाने गेली तीन वर्षे जनसेवा ग्रंथालय ‘साहित्यिक गुढी’ हा उपक्रम राबवित आहे. कोरोनाचे निर्बंध शिथील होताच यावर्षीही ग्रंथालयाच्या प्रांगणात साहित्यिक गुढीचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी गुढी उभी करून तीला पुस्तकांची माळ बांधण्यात आली होती. प्रसिध्द गझलकार देवीदास पाटील यांच्याहस्ते गुढीची उभारणी करून पुजा करण्यात आली, तर जनसेवाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांच्याहस्ते ग्रंथांचे पुजन करण्यात आले. यानंतर संगमेश्वरी बोलीतील लेखक अमोल पालये यांनी खणखणीत आवाजात गुढीसमोर सार्यांच्या साक्षीने गार्हाणे घातले.
गुढीनिमित्त ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
त्यानंतर जेष्ठ प्रवचनकार सु.द.भडभडे यांनी ‘संत एकनाथांची भारूडे आणि गौळणी’ या विषयावर विवेचन केले. जे लोकांमध्ये रुढ झाले ते भारुड अशी व्याख्या करत ‘अगं अगं विचू चावला… सत्वर पाव गं मला…’ या भारूडांचे गायन करत भावार्थ समजून सांगितला. संत एकनाथ हे शांतीब्रम्ह होते, हे सांगताना त्यामागील कथांचेही त्यांनी ओघवत्या शैलीत वर्णन केले.
या कार्यक्रमाला प्रसिध्द गझलकार देवीदास पाटील, जनसेवाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, कार्याध्यक्षा सुमित्रा बोडस, कार्यवाह राहुल कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य, श्रीनिवास सरपोतदार, सौ.लिमये, वाचक, सभासद, साहित्य-वाचकप्रेमी उपस्थित होते. ग्रंथपाल सौ.सिनकर, सुजाता कोळंबेकर, सौ.भोसले, शिवानी सागवेकर, श्री.धोपटकर, ओंकार मुळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
साहित्यिक गार्हाणे
साहित्यिक गार्हाण्यातून मराठी साहित्य परंपरेतील संत चक्रधरांपासून मराठीतील दिग्गज साहित्यिक, तसेच मराठीच्या बोलीभाषांना आवाहन करण्यात आले. वाचन चळवळ वाढीस लागावी, साहित्यात नवनिर्मिती व्हावी, वाचण्याची आवड निर्माण व्हावी, अशी भावना या गार्हाण्यातून व्यक्त करण्यात आली. ‘जनसेवावालं साहित्याची, पुस्तकांची, लोकांची शेवा करीत आलीलं हायतं. तेंच्या कारयात तेंनला यास देस.. वाचकांचो आशीरवाद भरभरानं मिलानं दे.. वाचकांचा पिरेम जनसेवाला लाभानं दे.. वाचकांचो आनी तेंचो गोडी-गुलाबीचो सवसार नांदू दे.. इचार-आचारांनी ती सगली मंडली यकटयं नांदून वाचन संस्कृतीची गुढी गगनात फडकानं दे रं साहित्यपुरषा म्हाराजा..’ अशी साद या गार्हाण्यातून घालण्यात आली.
साहित्य पताका
साहित्य पताका हे या गुढीचे विशेष होते. जनसेवाचे कृतिशील वाचक श्रीनिवास सरपोतदार यांनी यावर्षी ‘भावगीते’ हा विषय घेऊन पताका साकारल्या होत्या. पताकांवर भावगीते आणि त्यांचे कवी यांचे सुलेखन करून या पताका साकारल्या होत्या.