(लांजा)
सातत्याने कोसळलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला. यामुळे तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था कोलमडली आहे. महावितरणच्या अनागोंदी कारभाराने तालुक्यातील जनता त्रस्त आहे. याबाबत उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप दळवी यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीच्या कार्यालयात धडक मारत आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली महावितरणविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पावसाळ्यापूर्वी तयारी करणे अपेक्षित असताना महावितरण कंपनीने याकडे साफ दुर्लक्ष केले. यामुळेच लांजा तालुक्याला नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. सद्यःस्थितीत पाऊस कमी होऊन सुद्धा सुमारे ८० टक्के गावांमध्ये महावितरणची सेवा अद्यापही ठप्प पडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये गेले काही दिवस अंधारात काढावी लागली तर माचाळ येथे गेले ६ दिवस महावितरणची बत्ती गूल झाली आहे. मात्र महावितरणने पावसाळीपूर्व तयारी केली असती तर या समस्या टाळता आल्या असत्या, असे संदीप दळवी यांनी सांगितले.