(लांजा)
लांजा येथे घडलेल्या घृणास्पद प्रकारातील आणखी एक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे ६ वी मध्ये शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा मुख्याध्यापक फरार झाल्याने ग्रामस्थ आणखी आक्रमक झाले आहेत. मात्र पोलिसांनी या मुख्याध्यापकाला शोधण्यासाठी पथक रवाना केली आहेत.
सविस्तर वृत्त असे की, गवाणे केंद्र शाळा नंबर १ चा मुख्याध्यापक नथू सोनवणे याने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आल्यानंतर रविवारी २४ एप्रिल रोजी ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे मुख्याध्यापक सोनवणे याच्यावर लांजा पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र दोन दिवसांपासून तो बेपत्ता असल्याने त्याला अद्यापही अटक झालेले नाही.
लांजा पोलीस त्याच्या लांजा रेस्ट हाऊस येथील राहत्या घरी जाऊन आले. मात्र सदरचे घर बंद असून तो फरार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी लांजा पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. या घटनेनंतर गवाणेसह तालुक्यातुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.