( लांजा / प्रतिनिधी )
पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य सर्वानाच भुरळ घालणार असत. या निसर्ग सौंदर्यचा आनंद लुटण्यासाठी अनेक उत्साही पर्यटक धबधब्यावर जातात. आनंदाच्या भरात पाण्याचा हे पर्यटक जीवाशी खेळ खेळतात. त्यामुळे जीव गमावण्याची वेळ येते. मात्र आता लांजा तालुक्यातील खोरनिनको येथील धरणावर जाण्यास वेगळ्या कारणासाठी बंदी घालण्यात आली आहे. ती म्हणजे पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांनी पुढील दोन महिन्यांसाठी सदर ठिकाणी जाण्यास मनाई आदेश जारी केले आहेत.
या धबधब्याची मजा लुटण्यासाठी हजारो पर्यटक संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी येऊ लागले असल्याने दिवसेंदिवस मोठी गर्दी वाढू लागली होती. अशाच वेळी पावसाळ्यात खोरनिनको धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पर्यटक थोडेसे नाखूष झाले आहेत.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई
सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला वेग आला होता. या सांडव्यातून पडणाऱ्या पाण्यामुळे या ठिकाणी मोठा धबधबा निर्माण झालेला आहे. या धबधब्याखालीच पर्यटक आनंद लुटण्यासाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये,म्हणून मनाई आदेश जारी केले आहेत. सदर प्रतिबंधात्मक आदेशाचे उलंघन केल्यास कारवाई करण्यात येईल असे आदेश लांजा तहसीलदार प्रमोद यांनी दिले आहेत.