लसीच्या दोन मात्रांमधील अंतर वाढविल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढत असल्याचा इशारा अमेरिकेच्या अध्यक्षांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथोनी फाउची यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिला आहे.
केंद्र सरकारने गेल्या महिन्यांत दोन मात्रांमधील अंतर 84 दिवसांपर्यंत वाढविले आहे. फाउची म्हणाले, मॉडर्नाच्या दोन मात्रांमधील अंतर चार आठवडे आणि फायझरच्या दोन मात्रांमधील अंतर तीन आठवडे आहे. दोन मात्रांमधील अंतर वाढविले, तर तुम्ही करोनाच्या विषाणूला बळी पडण्याची शक्यता वाढते. बि‘टनमध्ये हेच घडले. त्यांनी दोन मात्रांमधील अंतर वाढविले आणि तेथे त्या काळात कोरोनाच्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे आम्ही मात्रांमधील अंतर निश्चित असण्याची शिफारस करतो. लसीचा पुरवठा अल्प असल्याने दोन मात्रांमधील अंतर वाढविले असावे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने गेल्या महिन्यांत कोव्हिशिल्ड लसीच्या दोन मात्रांमधील अंतर सहा ते आठ आठवड्यांवरून 12 ते 16 आठवडे केले होते. कोव्हिशिल्डच्या लसीमधील हे अंतर तीन महिन्यांत दुसर्यांदा वाढविण्यात आले होते. मार्च महिन्यांत राज्यांना लसीच्या दोन मात्रांमधील अंतर 28 दिवसांवरून सहा ते आठ आठवडे करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामुळे लसीची परिणामकारकता वाढत असल्याचे सांगण्यात आले. सरकार जास्तीत जास्त लोकांना लसीची पहिली मात्रा देण्यासाठी आणि लसीचा तुटवडा असल्याने हे बदल करीत असल्याचे दिसून येत होते. हा माफक दृष्टिकोन असल्याचे फाउची म्हणाले.
कोरोना विषाणूच्या पुढे राहण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. विशेषत: डेल्टा व्हेरिएंटसाठी ते आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. डेल्टा विषाणू अधिक प्रमाणात पसरतो. त्यामुळे हा विषाणू असलेल्या कोणत्याही देशाने चिंता करावी. त्याचा मुकाबला करण्यासाठी मोठी तयारी आणि लसीकरण करावे, असेही फाउची म्हणाले.