( क्रीडा )
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहित शर्मा हा टी-२० विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशानच्या नावावर हा विक्रम होता. दरम्यान, विराट कोहलीनेही काल नवा विक्रम केला. त्याच्या वर्ल्डकपमधील १ हजार धावा पूर्ण झाल्या. तो १ हजार धावा करणारा पहिला भारतीय ठरला. श्रीलंकेचा माहेला जयवर्धने ३१ सामन्यांत १ हजार १६ धावांसह अव्वल स्थानी आहे.
रोहित शर्मा काल (३० ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील ३६ वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. याबाबत त्याने श्रीलंकेचा माजी सलामीवीर तिलकरत्ने दिलशानचा विक्रम मोडला. तिलकरत्ने दिलशानने टी-२० विश्वचषक स्पर्धेत एकूण ३५ सामने खेळले आहेत. त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन या यादीत तिस-या क्रमांकावर आहे. शाकीबने टी-२० विश्वचषकात आतापर्यंत ३४ सामने खेळले आहेत. याचबरोबर सर्वाधिक टी-२० विश्वचषक खेळणा-या खेळाडूच्या यादीतही रोहित शर्मा आणि शाकीब अल हसन अव्वल आहेत. दोघेही आठव्यांदा टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळत आहेत.