(नागपूर)
यंदाचे वर्ष हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शतक महोत्सव आहे. या पार्श्वभूमीवर संघ परिवार आपल्या प्रशिक्षण पद्धतीत काही बदल घडविणार आहे. संघ आपली शिक्षा वर्गाची वेळ कमी करणार आहे. तसेच स्वयंसेवकाच्या हाती असणार्या बांबूच्या काठीचे स्वरुप बदलणार आहे.आता या काठीला ‘दंडा’ ऐवजी ‘यष्टी’ असे म्हटले असून त्याची लांबीही कमी केली जाणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १३ ते १५ जुलै दरम्यान उटी येथे झालेल्या विशेष बैठकीत या सर्व नव्या सुधारणांवर चर्चा करण्यात आली. आता स्वयंसेवकांच्या हाती असणार्या काठीचे स्वरुपही बदलणार आहे. या काठीची लांबी ५.३ फूट ऐवजी ३ फूट केली जाणार आहे आणि त्याला आता ‘यष्टी’ असे म्हटले जाणार आहे. मात्र त्यावर अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. तसेच प्रशिक्षणाचा कालावधी कमी केला जाणार आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी संघाचे प्रशिक्षण शिबीर हे २०-२० दिवसांचे असते. ते आता १५ दिवस आणि तिसर्या वर्षी तिसऱ्या वर्षाचे नागपूरमधील २५ दिवसांचे शिबिर २० दिवसांचे केले जाणार आहे. त्याचप्रमाणे पहिल्या वर्षाच्या प्रशिक्षण शिबिराला आता शिक्षा वर्ग आणि दुसर्या-तिसर्या वर्षांच्या प्रशिक्षण वर्गाला कार्यकर्ता विकास शिबीर असे संबोधले जाणार आहे. ही शिबिरे एप्रिल ते जून या कालावधीत होतात. यंदा या शिबिराला २० हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थीनी हजेरी लावली होती.