( राजापूर )
राजापूर तालुक्यातील काजिर्डा गावचे सरपंच अशोक शांताराम आर्डे यांचा नियमित दारूच्या सेवनाने मृत्यू झाल्यानंतर रायपाटण पोलिसांनी विभागातील दारूधंद्याविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. गेले दोन दिवसात पोलिसांनी दोन ठिकाणी धडक कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.
दि. ३० ऑक्टोबर रोजी सरपंच अशोक आर्डे यांचा आकस्मिक मृत्यू झाला. ते नियमित गावठी दारू सेवन करीत असत. यामुळे गावठी धंद्याविरोधात जोरदार टीका सुरू होत असतानाच रायपाटण पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल के. आर. तळेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी गावठी दारूधंद्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.
बुधवारी पोलिसांनी मूर, वाळवड, पाटीलवाडीत छापा टाकून मंगेश गोपाळ पडवळ (४७) याला गावठी दारूसह रंगेहाथ पकडले होते. तर मूर कोलतेवाडीत गावठी दारूसह एक महिलेला पकडले. त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच परिसरातील गावठी दारूधंद्यासह पोलिसांनी बुधवारी पाचलच्या आठवडा बाजाराच्या दिवशी वाहतुकीला अडथळे आणणाऱ्या १३ वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.