(महाड / चंद्रकांत कोकणे)
किल्ले रायगड वर जाण्यासाठी हिरकणी वाडी येथे रोपवेची सेवा काही वर्षापासून पर्यटक व शिवभक्तांना दिली जाते. सेवा सुरक्षित आणि अखंडितपणे चालू राहण्यासाठी देखभाल व दुरुस्ती केली जाते व त्याकरता ही सेवा अल्पकाळासाठी बंद ठेवावी लागते अशी माहिती रायगड रोपवेचे प्रकल्प प्रबंधक राजेंद्र खातू यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या दर्शनाकरता लाखो शिवभक्त गडाला भेट देण्यासाठी येतात . यामध्ये आबालवृद्ध, महिला पुरुष पर्यटक यांना रोपवे सेवेचा उपयोग होतो. मिलेनियम प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने प्रवाशांना किल्ले रायगड वर सुरक्षितपणे जाण्यासाठी रोपवेची सेवा उपलब्ध करून दिली आहे.
रोपवेची सेवा सुरू करण्यात आल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करण्याची संधी सर्वांना उपलब्ध झाली आहे. नियमित दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी दि. १३ ते १७ मार्च हे पाच दिवस रोपवे सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प प्रबंधक राजेंद्र खातु यांनी दिली.