आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांचा हा विदर्भ दौरा पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना राज्य सरकार, केंद्रीय निवडणूक आयोग, शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच राष्ट्रवादीच्या पक्षातील बंडखोरीवरुनही भाजपला चांगलेच झापलं. याशिवाय, राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री आहेत. यामुळे राज्याची सध्याची स्थिती एक “फुल्ल” दोन “हाफ” अशी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राज्यसरकारवर टीकास्त्र सोडले.
ठाकरे म्हणाले, “राजकारणात फोडाफोडी चालत असते. पण पक्ष पळवून नेण्याची वृत्ती खोडून काढावी लागणार आहे. मला खुर्चीचा मोह कधीच नव्हता. पण भाजपने शब्द पाळला नाही. भाजपला ठाकरे नको फक्त शिवसेना हवी आहे. दुसऱ्यांची घरं फोडण्याची विकृती फक्त भाजपमध्येच आहे. पक्ष पळवून नेण्याची वृत्ती खोडून काढावी लागणार आहे”, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला.
आमचे सरकार तीन चाकाचे होते आणि याचे सरकार त्रिशूळ सरकार झाले. हे बेगडी सरकार चिरडून टाकण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. मी घरात बसायचो, असे माझ्यावर आरोप करण्यात आले. पण मी घरात बसून महाराष्ट्राचा गाडा हाकला. माझे नेतृत्व ठरवण्याचा अधिकार जनतेकडे आहे, तुमच्याकडे नाही”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
राष्ट्रवादीच्या बंडखोरीचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भापजला टार्गेट केले. शिवसेनेतील ४० आमदार तुमच्यासोबत गेले, ज्यात काही अपक्षांचाही समावेश आहे. जवळपास १६० आमदारांचे मजबूत सरकार असताना राष्ट्रवादी चोरण्याची काय गरज होती? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी मंत्री संजय राठोडांवरही निशाणा साधला. 200 रुपये हफ्ता घेणाऱ्याला मंत्री कुणी केलं. पण तो हफ्ते घेत होता हे मला माहित नव्हत, असा टोला उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांना लगावला. तसेच भाजप आता बाजार बुणग्यांचा पक्ष झाला आहे. अनेक नेत्यांना मोठ्या कष्टाने भाजप वाढवला. मात्र आता निष्ठावंताची काय हालत होत आहे. भ्रष्टाचाराने माखलेल्या लोकांच्या सतरंज्या आता भाजपमधील निष्ठावंत अंधभक्त उचलत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.