(कोल्हापूर)
दिल्ली स्थित केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून डॉक्टराचे अपहरण करून १० लाखांची लाच मागणाऱ्या तोतया अधिकाऱ्यांच्या टोळीला सोमवारी कोल्हापूर पोलिसांनी पकडले. सुयोग सुरेश कार्वेकर, रवींद्र आबासाहेब पाटील, सुमित विष्णू घोडके (सर्व राहणार करवीर तालुका) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अँटी करप्शनचे अधिकारी असल्याचे भासवून रत्नागिरी जिल्ह्यातील कणेरी येथील एका डॉक्टरांचे अपहरण करून दहा लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला शाहूपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
राजापूर येथील डॉक्टर सुभाष अण्णाप्पा डाक (वय ५५, रा कनेरी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) यांना तुमचे वैद्यकीय व्यवसायाचे प्रमाणपत्र बोगस आहे. आपण नवी दिल्ली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी आहोत, असे सांगत या टोळक्याने तुम्ही बेकायदा गर्भलिंग चाचणी करून मासिक १० लाखांची कमाई करता, अशी कोल्हापूर येथील युनिटला लेखी तक्रार आली आहे. तुम्हाला कोल्हापूरला आमच्यासोबत यावे लागेल असे सांगून त्यांनी डॉक्टर डाके यांना मोटारीत बसविले. त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायाची कागदपत्रांची मागणी केली आणि शेवटी हे प्रकरण मॅनेज करण्यासाठी तुम्हाला १० लाख रुपये द्यावे लागतील, असे त्यांनी धमकवले.
गगनबावडा येथे जेवणासाठी हॉटेलमध्ये थांबल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. डॉ. डाक यांनी पैसे देण्यास असमर्थता दाखवल्याने अपहरणकर्ते त्यांना कोल्हापुरात घेऊन आले. दरम्यान, डॉ. डाक यांनी पत्नी आणि मामेभाऊ डॉ. सुधीर कांबळे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. सायंकाळी सातच्या सुमारास अपहरणकर्ते डॉ. डाक यांना घेऊन पोलिस अधीक्षक कार्यालयाशेजारी असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये पोहोचले. तुमच्यावर कारवाई करायची आहे, असे सांगून दवाखान्यातून इनोवा कारमधून कोल्हापूर येथे आणून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे तडजोड करत असताना शाहूपुरी पोलिसांनी जाऊन सदर व्यक्तींना ताब्यात घेतले.
संशय आल्याने डॉक्टर डाके यांनी कोल्हापूर येथील काही नातेवाईक आणि वकिलाशी संपर्क साधला. तसेच तातडीची सेवा देणाऱ्या ११२ क्रमांकावर संपर्क साधला. अगदी काही वेळात पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकरसह त्यांचे पथक दाखल झाले. त्यांनी भामट्यांना ताब्यात घेतल्यावर भांडाफोड झाला. संशयितांकडून आलिशान मोटार, बनावट ओळखपत्र, भारत सरकार व गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अशी अक्षरे पाटी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टक्के यांचे सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय श्वेता पाटील सहाय्यक फौजदार संदीप जाधव, बाबा ढाकणे, रवी आंबेकर, शुभम संकपाळ, लखन पाटील, संदीप बेंद्रे, कार्वेकर, सुर्वे आदींनी सहभाग घेतला. पुढील तपास शीतल कुमार कोल्हाळ हे करीत आहेत