(राजापूर)
राजापूर शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या कोदवली नदीवरील साहेबाचे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने शीळ जॅक वेलच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे राजापूरचे पाणी संकट गंभीर बनले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीसाठा संपू नये म्हणून येत्या १५ एप्रिल पासून राजापूर मध्ये पाणी कपात करण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी ही माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
राजापूर शहराला शीळ येथील जॅक वेल आणि कोदवली नदीवरील साहेबाचे धरण या दोन उद्भवांवरून पाणी पुरवठा केला जातो. मात्र साहेबाच्या धरणाला गळती सुरू आहे तसेच धरणात गाळ साचल्याने पाणी साठा पुरेसा होत नाही. त्यामुळे मे अखेरपर्यंत या धरणाचे पाणी पुरत नाही. याच ठिकाणी नवीन धरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे आता शीळ जॅकवेलवर पाण्यासाठी शहराला अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि उकळून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.