(जयपूर)
गेल्या तीन सामन्यांपासून चेन्नई सुपर किंग्सचा संघ जिंकत होता. पण ही चेन्नई एक्स्प्रेस रोखली ती राजस्थान रॉयल्सने. हे दोन्ही संघ दुस-यांदा समोरासमोर आले. पहिल्या सामन्यात राजस्थानने अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला होता. या सामन्यातही राजस्थाननेच चेन्नईवर बाजी मारली आणि धोनीपेक्षा संजू सॅमसनचेच नेतृत्व यावेळी चमकल्याचे पाहायला मिळाले. राजस्थानने चेन्नईपुढे २०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा चेन्नईला यशस्वीपणे पाठलाग करता आला नाही. त्यामुळे राजस्थानने या सामन्यात चेन्नईवर ३२ धावांनी विजय साकारला.
चेन्नईसमोर विजयासाठी २०३ धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात सीएसके २० षटकांत ६ गडी गमावून १७० धावाच करू शकला. शिवम दुबेने ३३ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याचवेळी ऋतुराज गायकवाडने २९ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त मोईन अलीने १२ चेंडूत २३ धावा केल्या. चेन्नईचे इतर सर्व फलंदाज फ्लॉप ठरले.
राजस्थानच्या २०३ धावांचा पाठलाग करण्यासाठी चेन्नईचा संघ उतरला पण त्यांना डेव्हॉन कॉनवेच्या रुपात पहिला धक्का बसला. ऋतुराज गायकवाडने ४७ धावांची खेळी साकारली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. आर. अश्विनने अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायुडू यांना झटपट बाद केले. त्यामुळे तिथेच चेन्नईच्या हातून सामना निसटला होता.
संजू सॅमसनने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर हे धडाकेबाज फलंदाजी करत होते. या दोघांनी ८ षटकांत ८६ धावांची दमदार सलामी दिली होती. बटलर आऊट झाला आणि कर्णधार संजू सॅमसन आला. तोपर्यंत यशस्वी जायस्वालने अर्धशतक पूर्ण केले होते.
तुषारने आपल्या १४ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनची विकेट काढली. संजू मोठा फटका मारायला जाणार, हे तुषारला माहिती होते त्यामुळे तुषारने त्यानुसार चेंडू टाकला. संजू मोठा फटका मारायला गेला आणि त्याची कॅच ऋतुराज गायकवाडने पकडली. संजू बाद झाला तरी चेन्नईवरील संकट कायम होते. कारण अजूनही अर्धशतकवीर यशस्वी फलंदाजी करत होता. पण तुषारने यावेळी त्यालाही तंबूचा रस्ता दाखवला. तुषारने यशस्वीला यावेळी अजिंक्य रहाणे करवी झेलबाद केले. मुंबईच्या या खेळाडूने चेन्नईच्या संघाचे धाबे चांगलेच दणाणले आणि ४३ चेंडूंत त्याने ७७ धावांची वादळी खेळी साकारली. यामध्ये आठ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. अखेरच्या षटकात राजस्थानने दमदार फटकेबाजी केली आणि त्यामुळेच त्यांना दोनशे धावांचा पल्ला गाठता आला.
या विजयासह राजस्थान संघ १० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यांनी आतापर्यंत ८ पैकी ५ सामने जिंकले आहेत. या पराभवानंतर चेन्नईचा संघ तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील CSK ने देखील आतापर्यंत ८ पैकी ५ सामने जिंकले आहेत. पण उत्तम नेट रनरेटमुळे राजस्थानचा संघ अव्वल स्थानावर आहे. तर गुजरातचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.