(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील सिद्धिविनायकनगर येथील वेश्या व्यवसाय प्रकरणात आणखी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील चौथा आरोपी समीर मंगेश लिंबुकर (वय २३, रा.देवरुख, सध्या आरोग्य मंदिर) याला शहर पोलिसांनी अटक केली आहे.
याआधी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केल्याने आता आरोपींची संख्या चार झाली आहे. या प्रकरणात पोलिस आता सखोल जाऊन तपास करीत असून त्यामुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. सदरचे आरोपी गेले अनेक महिने हा व्यवसाय करीत असून यासाठी त्यांनी विविध ठिकाणांचा वापर केला असल्याचेही पोलीस तपासात उघड होत आहे. या प्रकारात रत्नागिरी शहरातील काही लोकांच्या सहभागाबरोबर उच्चभू काहींचा समावेश असल्याचेही कळत आहे. यासाठी माहिती गुप्त रहावी म्हणून आरोपीनी काही कोड भाषा वापरत असल्याचे समजते.
परंतु या संबंधीच्या अन्य नावांबाबत पोलीस आरोपींकडे कसून चौकशी करत असून त्यातून या प्रकरणात गुंतलेल्या अनेकांची जंत्री बाहेर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात ज्या मुली सापडल्या आहेत त्यांच्याबाबतही पोलीस सखोल तपास करीत असून यामागे मुख्य सूत्रधार आहेत याचा तपास सुरू आहे.