(रत्नागिरी)
वाचाल तर वाचाल, असे थोर विभूतींनी म्हटले आहे. त्यामुळे अलीकडे मोबाईल, टीव्हीच्या दुनियेत अडकलेल्या बालकांनी वाचले पाहिजे. सध्या उन्हाळी सुट्टीचे दिवस असल्याने मुलेही आनंदित आहेत. विविध खेळ, पर्यटनस्थळी फिरायला जाणे यात ते गुंग आहेत. पण मज्जामस्ती करताना वाचनाची गोडी लागण्याच्या हेतूने रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने उत्कृष्ट बाल पुस्तक मित्र स्पर्धा आयोजित केली आहे. १७ मे ते २० जून या कालावधीत ही स्पर्धा चालणार असून विद्यार्थ्यांनी किमान १० पुस्तके वाचली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी वाचनालयात पुस्तके वाचावीत किंवा घरी नेऊनही वाचली तरी चालतील, त्यामुळे या स्पर्धेला बालवाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत मुले धम्माल मस्ती करत असतील. या मस्तीसोबत मुलांना वाचनाचीही गोडी लागावी या हेतूने आणि त्यानिमित्ताने वाचनालयात बालवाचक नियमित यावेत या करिता रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने उत्कृष्ट बालपुस्तक मित्र पुरस्कार योजना आखली आहे. उद्यापासून (ता. १७) ही स्पर्धा सुरू होणार असून २० जूनपर्यंत चालणार आहेत. विजेत्यांना पुस्तकरूपी बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
वाचनालयातर्फे प्रथमच अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उद्यापासून २० जूनपर्यंत वाचनालयात येऊन पुस्तके वाचणाऱ्या किंवा घरी नेऊन पुस्तके वाचणाऱ्या बालवाचकांसाठी ही विशेष स्पर्धा आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकाला वाचनालयाचे नियम बंधनकारक असतील. स्पर्धेसाठी वाचनालयातील किमान १० पुस्तके त्याने वाचलेली असावीत. स्पर्धकाचा वयोगट १० ते १५ वर्षपर्यंत ठेवला आहे. स्पर्धकाने वाचलेली पुस्तक संख्या, वाचलेल्या पुस्तकांचे विषय, वाचलेल्या पुस्तकांचे परीक्षण या आधारावर स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे.
सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच प्रथम विजेत्यास १००० रुपयांची पुस्तके, द्वितीय क्रमांकास ७०० रुपयांची पुस्तके आणि तृतीय क्रमांकास ५०० रुपयांची पुस्तके देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी नियम, अटी लागू राहतील. १९५ वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयामध्ये १ लाख ११ हजार पुस्तके आहेत. यात मराठी, संस्कृत, इंग्रजी, हिंदी यासह विविध भाषांतील पुस्तके आहेत. वाचनालयाचे स्वतःचे अॅप आहे. तसेच वाचनालयात अद्ययावत यंत्रणांनी पुस्तके जतन केली आहेत. जयस्तंभ येथे वाचनालयाची वास्तू आहे. त्यामुळे रत्नागिरी शहराच्या खालच्या भागातील विद्यार्थी असोत किंवा वरच्या भागातील विद्यार्थ्यांसाठीही हे ठिकाण मध्यवर्ती आहे.
बालवाचकांसाठी युद्धकथा, फास्टर फेणे, इसापनिती, साहसकथा, शास्त्रज्ञांच्या कथा, शास्त्रज्ञांच्या कथा यासह लहान मुलांसाठी अनेकविध प्रकारची पुस्तके आहेत. बालवाचकांनी वाचनालयात सकाळी ९ ते दुपारी १२.३० या वेळेत किंवा दुपारी ३.३० ते सायंकाळी ७ या वेळेत येऊन वाचण्यास हरकत नाही. त्यांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच काही मुलांना घरी नेऊन पुस्तके वाचायची असल्यास पुस्तक घरी न्यायला दिले जाईल. नोंदणीकरिता मुलाचे शाळेचे ओळखपत्र, पालकांचा पत्ता आदी माहिती द्यावी, असे आवाहन अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.