( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरीच्या हॉटेल विवेक येथे संपन्न झालेल्या आमदार उदय सामंत, भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंफिगो, ओएनजीसी व क्रिस्टल पुरस्कृत रत्नागिरी लीग सीजन ५-२०२२ च्या अंतिम सामन्यात कॅरम लव्हर्स संघाने बाजी मारली. त्यांनी सत्यशोधक स्ट्रायकर्स संघाला २-१ असे पराभूत करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. त्यांच्या महम्मद अरिफने अहमद अली सय्यदवर चुरशीच्या लढतीत २० – २२, २५ – १, २५- ६ असा विजय मिळविला. दुसऱ्या सामन्यात के. श्रीनिवासने योगेश परदेशीवर दोन सरळ सेटमध्ये २५- ८, २५-४ अशा विजयाची नोंद केली, तर दुहेरी सामन्यात मात्र सत्यशोधक स्ट्रायकरच्या महम्मद घुफ्रान व एल. सूर्यप्रकाश जोडीने कॅरम लवर्सच्या अभिषेक चव्हाण व राहुल सोळंकीवर तीन सेटमध्ये ४-२५, २४- १९ व २५ – २० अशी मात केली होती.
विजेत्या संघाला १ लाख ७५ हजार तर उपविजेत्या संघाला १ लाख ५० हजारांचे रोख इनाम व चषक देण्यात आला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या लायबा कॅरम मास्टर्सला १ लाख २५ हजारांचे इनाम व चषक देण्यात आला. महम्मद अरिफ या लीगमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला त्यालाही रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. शिवाय स्पर्धेतील सर्व व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅम करणाऱ्या खेळाडूंना रोख पारितोषिके देण्यात आली.
विजेत्यांना आंतर राष्ट्रीय कॅरम महासंघाचे महासचिव वी. डी. नारायण, अखिल भारतीय कॅरम महासंघाच्या महासचिव श्रीमती भारती नारायण, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शहा, उपाध्यक्ष अरुण केदार व शांताराम गोसावी, सचिव यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत, रत्नागिरी टाइम्सच्या संपादिका श्रीमती उर्मिलाताई घोसाळकर, मुंबई क्रिकेट अससोसिएशनचे माजी उपाध्यक्ष पंकज ठाकूर, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम अससोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.