(रत्नागिरी)
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या विविध पुरस्कारांचे वितरण येत्या रविवारी (ता. ११) दुपारी ३.३० वाजता शेरे नाका येथील राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
या वेळी राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार खो-खो पटू सायली दिलीप कर्लेकर (रत्नागिरी), धन्वंतरी पुरस्कार डॉ. शाम गोपाळराव जेवळीकर (रत्नागिरी), आदर्श पौरोहित्य पुरस्कार वे. मू. गणेश दत्तात्रय खेर (भू, राजापूर), आदर्श कीर्तनकार पुरस्कार ह.भ.प. दत्तात्रेय तथा दत्तराज नरसिंह वाडदेकर (देवरुख), दर्पण पुरस्कार सुरेश वामन सप्रे (देवरुख), आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार सदानंद रघुनाथ ठाकुरदेसाई (मोरोशी, ता. राजापूर), उद्योजक पुरस्कार महेश मोहन गर्दे (रत्नागिरी), उद्योगिनी पुरस्कार शिल्पा नितीन करकरे (तुरळ, ता. संगमेश्वर) यांना प्रदान करण्यात येणार आहे. शाल, पुस्तक, रोख रक्कम, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांना वडिलांकडून उद्योजकीय वारसा मिळाला. पितांबरी प्रॉडक्टस नावाने कंपनी सुरू केली. सध्या कंपनीत ११ विभाग सुरू असून होमकेअर, हेल्थकेअर, अॅग्री, सोलार, डिजीकेअर अशा विभागांत मिळून कंपनीची ८२ उत्पादने आहेत. पितांबरीची उत्पादन केंद्र रत्नागिरी जिल्ह्यासह ठाणे, राजस्थान, गुजराथमध्येही आहेत. दापोलीजवळ साखळोली येथे ५० एकरवर आयुर्तेज गार्डनची निर्मिती करून त्यात ५०० दुर्मिळ वनौषधींची व सुगंधी फुलझाडांची नियोजनबद्ध लागवड केली आहे. या फुलांच्या अर्कापासून देवभक्ती अगरबत्ती तयार करण्याचा कारखानाही याच ठिकाणी आहे. राजापूर तालुक्यातील ताम्हाणे येथे अगरबत्तीच्या काडीसाठी उपयुक्त तुल्डा जातीच्या बांबूची व अन्य ४० प्रकारच्या बांबूची लागवड करून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये बांबूसंबंधित उत्पादनांबाबत जागरुकता निर्माण केली जात आहे. श्री. प्रभुदेसाई यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ते या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. नवउद्योजकांना त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख देणगीदारांचेही सत्कार करण्यात येणार आहेत. पुरस्कार वितरणाच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये यांनी केले आहे.