[ रत्नागिरी ]
मुंबईतील गावप्रेमी चाकरमानी दरवर्षी उन्हाळ्यात आपल्या सुट्ट्यांचे नियोजन करून आपल्या कोकणातील गावाकडे आले आहेत. तर काही चाकरमानी परतीच्या प्रवासाची वाट धरली आहे. रिझर्व्हेशन मिळवण्यासाठी रत्नागिरी एसटी डेपोमध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. काही लोकांना तास तीन तास ताटकळत उभे राहून सुद्धा तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
कोकणात दाखल झालेल्या मुंबईकरांची संख्या वाढती असली तरी एस टी महामंडळाने कोणत्याही प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी तत्पर असणे आवश्यक आहे. कोकणातील चाकरमानी परतीचा प्रवास एसटी बसमधुन करून मुंबई गाठत असतो. यातून मे महिन्यात रत्नागिरी एस टी महामंडळाच्या उत्पन्नात मोठी वाढ होते. मात्र नियोजनाचा अभाव रत्नागिरी एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सुट्टीचा कालावधी संपत असल्याने चाकरमानी परतीची वाट धरत आहे. रिझर्व्हेशन मिळवण्यासाठी खिडकीवर प्रचंड गर्दी होताना दिसते. कोकणातुन मुंबई पुण्यात जाणाऱ्या नियमित गाड्यांसह स्पेशल गाड्यांचे तिकीट मिळवण्यासाठी चाकरमानी जंगजंग पछाडत असतात. काहीजण रात्रीपासूनच डेपो परिसरात असतात. ऑफिसची वेळ होताच तिकीट खिडक्यांवर रांगा लावतात. मात्र, तिकीट खिडकी उघडताच आरक्षण हाऊसफुल्ल होत असल्याने तासनतास रांगेत उभ्या राहणाऱ्या अनेक चाकरमान्यांच्या पदरी घोर निराशाच पडून तिकिटावीणा माघारी परतावे लागते. तर दुसरीकडे आयटीआय कॉलेज सुरू असल्याने विद्यार्थि देखील पास काढण्यासाठी येत असतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी असल्यामुळे गेले कित्येक दिवस विद्यार्थी पास खिडकी बंद आहे. त्यामुळे सदर खिडकीतुन रिझर्व्हेशन तिकीट देण्यास चालू करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. एकूणच एसटी महामंडळाच्या नियोजन शून्य कारभारामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होताना दिसून येते.
प्रवासी खासगी गाड्यांकडे वळण्याची शक्यता
अनेकजण उन्हाळी सुट्टीसाठी कुटुंबीयांसह गावची वाट धरतात व गावी जाण्यासाठी एसटी बस, एसटी प्रवास किफायतशीर, सुरक्षित, वेळेची बचत आणि कमी त्रासदायक असा वाटत असल्याने त्यांची पहिली पसंती एसटी गाड्यांनाच असते. मात्र रत्नागिरी एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे प्रवासी आता खासगी गाड्यांकडे वळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार समोर असतानाही स्थानक प्रमुख ऑफिसमध्ये हजर नसल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांची गैरसोय होताना एसटीचे कर्मचारी हतबलपणे हा प्रकार पाहत असतात परंतु याबाबत बोलणार कोणाला असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होत असतो.
चाकरमान्यांची मे महिन्यात होणारी ही वारेमाप गर्दी पाहता एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी नियोजन करून विशेष लक्ष दिले असते तर प्रवाशांची होणारी गैरसोय टाळता आली असती. मात्र स्थानक प्रमुखच आगारात येत नसल्याचे बोलले जात आहे. जर अधिकारीच कार्यालयात हजर राहत नसतील तर याकडे लक्ष देणार तरी कोण? असा सवाल उपस्थित झाल्यावाचून राहत नाही. मे महिन्याच्या कालावधीत महामंडळाचे अधिकारी वर्गाने प्रवाशांना चांगल्या सेवा देण्याकडे व त्यातून आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, या दृष्टीकोनातून विचार करणे आवश्यक आहे. परंतु रत्नागिरी एसटी महामंडळाच्या कारभारावरून तसे होताना दिसत नाही. दरवर्षीच्या तुलनेत मे महिन्यातील आर्थिक नफ्याचा चढता आलेख यावर्षी मात्र खाली घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामधून एसटी प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रवाशांच्या होत असलेल्या गैरसोयीबाबत रत्नागिरी DM संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता यावेळी ते म्हणाले, BSNL सर्वर असल्याने एक तिकीट काढण्यास ७ ते ८ मिनिट लागत असून यामुळे गर्दीत वाढ होत असते. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत कर्मचाऱ्यांची जेवणाची वेळ कमी करण्यात आली आहे. यातुन गर्दी कमी होण्यास मदत होईल. असे रत्नागिरी DM संदीप पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्याची पास खिडकी बंद आहे त्याठिकाणी आरक्षित तिकिटे चालू करण्यासंदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, सर्वर एकाच ठिकाणी मर्यादित असल्याने इतर खिडकीतून चालू करू शकत नाही. काही दिवसांनंतर इथे सुरू असणारी यंत्रणा राहाटाघर डेपोतुन सुरू करण्यात येणार आहे. सद्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने शक्य तेवढे प्रयत्न करत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
– रत्नागिरी DM संदीप पाटील