रत्नागिरी : येथील रेल्वे स्थानकाजवळील चायनीज सेंटरवर राज्य उत्पादन शुल्क खात्याकडून करण्यात आलेल्या धडक कारवाईत २ लाख ८८ हजारांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. चायनीज सेंटरमध्ये अवैध दारू विक्री करत असलेल्या अविनाश सिताराम दळवी यांच्याविरोधात हि कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी संशयिताच्या हुंडाई आय टेन गाडीची पोलिसांनी झडती घेतल्यावर सुमारे दोन लाख ८८ हजार ९६० रुपयाची देशी-विदेशी दारुचा साठा सापडला. ही कारवाई २३ जून रोजी सायंकाळी सात वाजता राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने केली आहे.
रत्नागिरी शहरातील रेल्वे स्टेशन फाट्याजवळील रत्नप्रभा हाउसिंग सोसायटी येथे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने गाडीत लपवून ठेवलेली दारू जप्त केली असून ही गाडी दारू विक्री साठी वापरत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही .वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने धाड टाकली. या कारवाईमध्ये भरारी पथकाचे निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक सुनील सावंत, किरण पाटील, जवान विशाल विचारे, अनिता नागरगोजे यांचा समावेश होता.