( प्रतिनिधी / रत्नागिरी )
रत्नागिरी शहरातील खड्डेमय रस्ते आणि 60 कोटी रुपये खर्च करून राबवलेली पाणी योजना अपयशी ठरली आहे. यामुळे रत्नागिरी वासियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत बहुजन समाज पार्टीने आवाज उठवत आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. हे निवेदन उपजिल्हाधिकारी लष्करे यांनी स्वीकारले.
रत्नागिरी येथे मोठा गाजावाजा करून मार्च महिन्यापासून रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात शासकीय निधीचा वापर करून करण्यात आले. परंतु पहिल्या पावसातच ह्या नविन रत्यांवरून मोठ मोठे खड्डे व काही ठिकाणी रस्ताच दिसेनासा झाला आहे. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून नविन केलेला रस्ता कोणासाठी करण्यात आले या विषयी लोक मोठ्या प्रमाणात चर्चा करीत असून संबंधीत कंत्राटदारांना फायदा व्हावा व संबंधीत पर्यवेक्षकीय अधिकारी यांना त्या कामातून फायदा मिळावा हाच उद्देश होता का? असा सवाल देखील बहुजन समाज पार्टीने निवेदनातून उपस्थित केला आहे.
नविन झालेले रस्ते किमान १५ वर्षे टिकतील अशा पध्दतीचे करावेत असे कंत्राटदाराकडून टेंडर भरीत असताना त्याच्या सहीनिशी लिहून घेतले जाते. परंतु कंत्राटदार यांने सर्व रस्त्यांची कामे निकृष्ठ दर्जाची केलेली आहेत. त्यामुळे संबंधीत कंत्राटदारावर सिव्हील क्रिमिनल नुसार फौजदारी दाखल करुन त्याला काळ्या यादीत टाकावे. तसेच या कामावर प्रामुख्याने नगर परिषदेतील संबंधीत पर्यवेक्षकीय अधिकारी, इंजिनिअर याने देखील कामावर योग्य लक्ष दिलेले नाही. त्याचमुळे अशाप्रकारचे निकृष्ठ रस्ते तयार झालेले आहेत. आपल्या कामामध्ये कलेल्या हलगर्जीपणाचा त्रास सामान्य रत्नागिरीकरांना भोगावा लागत आहे. त्यास जबाबदार संबंधीत रत्नागिरी नगर परिषदेतील अधिकारी आहेत. सदर प्रकरणाची आपण जातीनिशी चौकशी करुन त्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी. अशी मागणी बहुजन समाज पार्टीकडून जिल्हाधिकारी डॉ बी. एन. पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, भारत देशावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले, त्यांच्या कार्य काळात त्यांनी या देशात अनेक विकासात्मक कामे केली. यामध्ये १०० वर्षा पूर्वी बांधलेले पुल, विविध शासकीय इमारती, बंधारे, रस्ते आज देखील सुस्थितीत आहेत. परंतु सध्या होत असलेली विकास कामे ही १०० दिवस देखील टिकताना दिसत नाही. रत्नागिरी शहरातील अंतर्गत नविन पाणी योजना व त्यानंतर नव्याने तयार केलेले रस्ते गेली काही वर्षे खड्डेमय झाले आहेत. ज्या पाणी योजनेसाठी गेली ५ वर्षे रत्नागिरीकरांना जो शारीरिक व मानसीक त्रास झाला त्यास सर्वस्वी जबाबदार या कामातील संबंधीत कंत्राटदार व संबंधीत पर्यवेक्षकीय अधिकारी जबाबदार आहेत. काम करीत असताना कोणत्याही प्रकारचा लोकांचा विचार न करीता फक्त आपणास काम मिळाले आहे व ते कोणताही विचार न करता अत्यंत निकृष्ठ दर्जाचे काम झालेले दिसत आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात त्यांनी पुढे म्हंटले आहे की, टाकलेल्या पाईपलाईन ह्या रस्त्याच्या मधोमध आहेत व खूप ठिकाणी लिकेज आहेत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. तरी संबंधीतांवर आपण कार्यवाही करावी, अशी निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बसपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रेमदास गमरे, शहराध्यक्ष प्रितम आयरे, विधानसभा अध्यक्ष राजू जाधव उपस्थित होते.