(मुंबई)
मुख्यमंत्री रविवारी रात्री दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या या दौऱ्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामागचे कारण गुलदस्त्यात आहे असले तरी केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने हा अवघ्या काही तासांचा हा दौरा असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री रविवारी सायंकाळी ६.३० साडेपाच वाजताच्या सुमारास पुण्याहून दिल्लीसाठी रवाना झाले. या दौऱ्यात मुख्यमंत्री कोणाची भेट घेणार आहेत, हे जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
शिंदे गटाला पक्षाचे ‘चिन्ह’ आणि ‘नाव’ मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच केंद्रातही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. शिंदे यांच्यासोबत गेलेले खासदार केंद्रातील सत्तेत वाटा मिळत नसल्याने नाराज असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांना मंत्रीपदाची संधी मिळण्याच्या दृष्टीनेही या दौऱ्यात चर्चा होऊ शकते, असे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवण्यात आला आहे. यावर सल्ला-मसलत करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत गेल्याची चर्चाही आहे.