(महाड / चंद्रकांत कोकणे)
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गावाच्या हद्दीत निसर्ग हॉटेल समोर आज सकाळी ६:५० वाजण्याच्या सुमारास एमजी व्हिक्टर आणि एर्टीगा कार या दोन कारमध्ये सामोरा समोर धडक बसून अपघात झाला .या अपघातात एर्टीगा कारचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये खेड (जिल्हा रत्नागिरी) मधील दोन जण जखमी झाले.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत खेड ते मुंबई जाणारी एमजी व्हिक्टर कार क्रमांक एम एच-०८ ए एन -८७०० आणि मुंबई ते गुहागर जाणारी एर्टीगा कार क्रमांक एम एच-०३ ई बी-९७२५ या दोन वाहनांमध्ये सकाळी ६:५० वाजण्याच्या सुमारास जोराची धडक झाली.या अपघातात एमजी व्हिक्टरचे मोठे नुकसान झाले. या अपघातात संतोष रामचंद्र पाटणे-५३, सुनील दत्ताराम चव्हाण-५४ दोघेही राहणार खेड जिल्हा रत्नागिरी हे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक मदत पोलीस महाडचे पोलीस निरीक्षक संजय भोसले आणि पोलीस नाईक अजय मोहिते घटनास्थळी हजर झाले. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गा लगतच असलेले महाड तालुक्यातील दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची सेवा उदासीन झाली आहे.या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या काही अंतरावरच हा अपघात झाला होता. मात्र आरोग्य केंद्र बंद असल्याने जखमींवर महाडमध्ये उपचार करावे लागले.