( रत्नागिरी / प्रतिनिधी )
समुद्रात मासे गरवण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा पाय घसरुन समुद्रात पडल्याने बेपत्ता झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे येथे घडली. अंकुश रामचंद्र भुते (45, रा. कुणबीवाडी, नांदिवडे जयगड, रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत सुर्वेश तेरेकर (30, कुणबीवाडी, नांदिवडे, जयगड, रत्नागिरी) यांनी जयगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार 20 जुलै रोजी सकाळी 10 वा. अंकुश भुते हे समुद्रकिनारी मासे गरवण्यासाठी गेले होते. पाय घसरल्याने ते पाण्यात ओढले गेले. त्यांना पाण्यामध्ये बुडताना सर्वेश याने पाहिल्यानंतर वाचवण्यासाठी तो पाण्यात उतरला. पण पाण्याला करंट असल्याने त्यांच्याही पायाखालची वाळू सरकायला लागली. दरम्यान अंकुश समुद्राच्या लाटांमध्ये ओढले गेले आणि काही वेळाने दिसेनासे झाले. ते अजूनही बेपत्ता आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक संदेश मोंडे करत आहेत.