(रायगड / चंद्रकांत कोकणे)
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या रेपोली गावाजवळ हा भीषण अपघात झाला असून भरधाव ट्रक आणि एको कारची समोरासमोर धडक झाली. यात तब्बल ९ प्रवासी ठार झाले असून एक 4 वर्षांचा मुलगा आश्चर्यकारकरित्या बचावला असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.
माणगाव तालुक्यातील, गोरेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत रेपोली गावाजवळ आज (गुरुवार, १९ जानेवारी) रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात इको कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. ट्रक लोटे परशुराम औद्योगिक वसाहती मधून मुंबईकडे जात होता तर मुंबईहून गुहागर कडे जाणारी कार जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघातामध्ये 5 पुरुष 3 महिला आणि एका लहान मुलगी असे ९ जण मयत झाले आहेत. एक लहान मुलगा जखमी असून त्याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल केले आहे. मयत इसम एकमेकांचे नातेवाईक असून ते हेदवी, ता. गुहागर येथे चालले होते. सध्या हायवे वरची वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
मृत्यूचा सापळा बनत चाललेल्या मुंबई गोवा महामार्गाचे बांधकाम मागील कित्येक वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. तसेच सातत्याने या रस्त्यावर अपघात होत असून अद्यापही शासन प्रशासनाला जाग आलेली नाही, त्यामुळे अजून किती नागरिकांचे बळी गेल्यावर सरकार जागे होणार, असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत.