(खेड/प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन शिष्यवृत्ती परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रविष्ठ केले आहे. त्यांचा अधिकधिक सराव घेऊन जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने शिष्यवृत्ती परीक्षा तयारी करावी असे तालुक्यांना सूचित केले आहे. या जिल्ह्याच्या सूचनेनुसार गुणवत्तावाढीसाठी खेड तालुका पंचायत समितीच्यावतीने देखील अधिक प्रयत्न व सराव सुरू आहे. यासाठी सराव परीक्षेसाठी संघटनांनी सहकार्य करण्याचे आवाहन तालुका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात करण्यात आले होते. “बालके शिक्षण शिक्षक यांची पक्षपाती” या आपल्या ब्रीद प्रमाणे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा खेडच्यावतीने तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या इयत्ता ५ वी, व इयत्ता ८ वीतील मराठी व उर्दू माध्यमाच्या एकूण ९४३ विद्यार्थ्यांना तालुका स्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेसाठी पेपर -१ व पेपर -२ यांच्या प्रश्नपत्रिका संच व उत्तरपत्रिका गटशिक्षाधिकारी श्री.श्रीधर शिगवण व तालुका गुणवत्ता विकास समिती प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी श्री. संतोष भोसले यांचेकडे सुपूर्द करण्यात आल्या.
प्राथमिक शिक्षक समिती ही शिक्षकांच्या प्रश्नांसह विद्यार्थ्यांप्रती व गुणवत्ते प्रती कायम आग्रही असणारी संघटना आहे विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी प्रशासनाने घेतलेल्या उपक्रमाला वेळोवेळी सहकार्य केलेले आहे तीच बाब कायम ठेवून आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती खेडच्या वतीने तालुका सराव परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका संच प्रशासनाला सुपूर्त करण्यात आले. यापुढेही तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणार्या उपक्रमांना शिक्षक समितीच्या वतीने कायमस्वरूपी सहकार्य करण्यात येऊन विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी कायम आग्रही राहील असे प्रतिपादन तालुकाध्यक्ष शरद भोसले यांनी केले.
प्राथमिक शिक्षक समिती शिक्षकांच्या प्रश्नासह विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाप्रती कायम सजग राहणारी तालुक्यातील एक आग्रही व आघाडीची संघटना असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण यांनी या प्रसंगी व्यक्त केले. शिक्षक समितीच्या प्रश्नांची प्रशासनाकडून कायम योग्य ती दखल घेतली जाईल असे प्रतिपादन केले. या उपक्रमाला बहुमोल असे सहकार्य केल्याबद्दल तालुका अध्यक्ष श्री शरद भोसले यांचा संघटनात्मक प्रतिनिधी म्हणून पंचायत समिती खेडच्यावतीने शाल, श्रीफळ, पुषपगुच्छ देऊन सन्मान करत संघटनेला विशेष धन्यवाद देण्यात आले.
या प्रसंगी तालुका अध्यक्ष शरद भोसले, जिल्हा प्रतिनिधी संजय गडाळे, उपाध्यक्ष बबन साळवी, उपाध्यक्ष अनिल यादव, प्रसिध्दी प्रमुख शैलेश पराडकर, दिलीप यादव, तुकाराम काताळे, नारायण शिरकर, नवनीत घडशी, दिपक कांबळे, ईश्वर तागड यांचेसह केंद्रप्रमुख श्री.दराने सर, श्री.उंडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.