(नवी दिल्ली)
राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी काँग्रेसने दिल्लीत महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी राज्यातील काँग्रेसचे ३५ बडे नेते उपस्थित होते. ११ ते ३ अशी चार तास ही बैठक सुरू होती. या बैठकीत राज्य संघटनेतील बदल, लोकसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल या बैठकीत हजर होते. विशेष म्हणजे या बैठकीतील प्रदीर्घ चर्चेबाबत नेत्यांनी फार माहिती देणे टाळले आहे.
नेत्यांनी आपापसातले वाद मिटवून कामाला लागावे, असा सल्ला काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेत्यांना दिला आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीतील घडामोडींचा आपल्यावर परिणाम होऊ देऊ नका, असेही सांगण्यात आले. लोकसभेसाठी किमान २० जागांचे टार्गेट काँग्रेस हायकमांडकडून महाराष्ट्र प्रदेश समितीला देण्यात आले. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, सतेज पाटील, अशोक चव्हाण, वर्षा गायकडवाड, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्याच्या राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा झाली. नेत्यांनी आपली मते मांडली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षासोबत आम्ही निवडणूक लढवणार आहोत. तसेच राहुल गांधी यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, महाराष्ट्रात आमचे उद्दिष्ट काँग्रेस पक्षाला मजबूत करणे आणि लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडणे हे आहे. सत्तेतल्या जनविरोधी सरकारचा पराभव करणे हे आमचे ध्येय आहे.
“काँग्रेस एकसंघ आहे. महाराष्ट्रात काँग्रेस फुटणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष काँग्रेस असेल. काँग्रेसची सध्या लाट आहे. आज लोकांनी ते मान्य केलं आहे, त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेलच. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमचं ४८ जागांवर काम सुरू आहे. जर आघाडी झाली तर आमच्या पक्षाची ताकद त्यांना मिळेल. महाराष्ट्र असं राज्य आहे जिथे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. जे आमच्यासोबत येतील, त्यांना आमचा फायदाच होणार आहे”, असं नाना पटोले म्हणाले.
राज्यातील नेत्यांनी आपापसातील मतभेद विसरावे आणि कामाला लागावे. येत्या लोकसभेसाठी राज्यातून किमान २० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवावे, असा आदेश काँग्रेसच्या हायकमांडने राज्यातील नेत्यांना दिला. यावेळी येत्या सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात यात्रा काढावी आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात बस यात्रा सुरू करावी, असाही ठराव घेण्यात आला.