(नवी दिल्ली)
जगभरात मंदीच्या सावटामुळे प्रत्येक क्षेत्रात टाळेबंदी होऊ लागली आहे. आयटी क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसत आहे. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये अधिक लोकांनी नोक-या गमावल्या आहेत. दुसरीकडे आर्थिक वर्ष २०२३ च्या तिस-या तिमाहीत आयटी कंपन्यांनीही कमी नोकरी भरतीचे प्रमाण कमी केल्याचे दिसून आले.
देशातील टॉप ४ आयटी कंपन्यांनी तिस-या तिमाहीत ५ हजारपेक्षा कमी लोकांना नोक-या दिल्या आहेत. नोक-या देण्याच्या बाबतीतही दुस-या तिमाहीत घट झाली आहे. या कालावधीत २८,८३६ कर्मचारी जोडले गेले, जे पहिल्या तिमाहीच्या निम्मे होते. कर्मचा-यांच्या संख्येत टीसीएसमध्ये २१९७ कर्मचा-यांची कपात करण्यात आली असून विप्रोमध्ये ५०० कर्मचा-यांची कमतरता आहे.
मंदीच्या अर्थव्यवस्थेत कमाल वेतन बिंदूवर नवीन कर्मचा-यांना कामावर न घेण्याबाबत आयटी कंपन्यांचा अधिक कल दिसून येत आहे. अशा परिस्थितीत येत्या तिमाहीत कर्मचा-यांना देण्यात येणा-या नोक-यांमध्येही घट होण्याची शक्यता आहे.
मंदीच्या भीतीने धास्तावलेल्या बहुतांश कंपन्यांनी सध्या कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात केली आहे. दैनंदिन खर्चासोबत कर्ज इत्यादींचा बोजा उचलणाऱ्या नोकरदाराचे हात रिकामे झाले, तर त्याच्यावर संकटांचा डोंगर कोसळू शकतो. त्यामुळे अशावेळी अशा कंपनीत सहभागी होण्याचा आग्रह धरला पाहिजे, ज्याची आर्थिक स्थिती मजबूत असेल जी मंदीचे धक्के सहन करू शकेल. जर तुम्ही एखाद्या चांगल्या आयटी कंपनीशी संबंधित नोकरीत असाल, तर मंदीचे सावट संपेपर्यंत स्वत:ला टिकवून ठेवले तर चांगले होईल आणि काही पैसे वाढवण्याच्या लालसेने नोकरी बदलण्यात स्वत:ला मोठ्या आर्थिक संकटात टाकू नका, असे जाणकारांचे मत आहे.