तत्त्वांमध्ये मी पण गेले, निर्गुण रूप उरले, सोहम भावाने आत्मनिवेदन प्रत्ययास आले. देव-भक्त ऐक्य झाल्यावर विभक्तता नष्ट होते. निर्गुणाला जन्म मरण नाही. निर्गुणाला पाप-पुण्य नाही, निर्गुणी झाला की मुक्त होतो. तर कोहम भावात गुंतलेला असेल तर प्राण्याच्या मनात संशय निर्माण होतो. स्वतःला स्वतःची भूल पडते. गुरफटलेला माणूस कोहम असे म्हणतो तर विवेकी माणूस सोहम म्हणतो. आत्मतत्व प्राप्त होताच अहम-सोहम मावळतात. त्यानंतर उरलेले स्वरूप म्हणजे संत. देही असूनही देहातीत असे त्याचे स्वरूप असते. संशयी वृत्ती नाहीशी व्हावी म्हणून हे आधी बोललेलेच पुन्हा बोलावे लागले, या प्रसंगाबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे महोद्भवभवनाम तृतीय समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक सहावे समास चौथा मायाब्रह्मनिरूपण
जय जय रघुवीर समर्थ. जयश्री राम. कृतयुग १७२८००० वर्षे होते तर त्रेतायुग १२९६००० वर्षे, द्वापार युग ८,६४००० वर्षे, तर कलीयुगाची वर्षे ४,३२००० होत. चार युगे मिळून ४३२०००० वर्षे होतात. अशा प्रकारची चार युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. असे सहस्र दिवस म्हणजे विष्णूची एक घटका. अशा विष्णूच्या सहस्र घटिका म्हणजे ईश्वराचा एक पळ. असे ईश्वराचे सहस्र पळ म्हणजे शक्तीचे अर्धे पळ अशी संख्या सर्व शास्त्रांमध्ये सांगितली आहे. अशी अनंत शक्ती असून अनंत रचना होते आणि जाते. तरीदेखील परब्रह्माची अखंड स्थिती मोडत नाही. वास्तविक पाहता परब्रह्माला कसली आली स्थिती? पण ही एक बोलण्याची रीत आहे. वेद आणि श्रुती देखील परब्रह्माबाबत नेति नेति असे म्हणतात.
४७६० मध्ये म्हणजे शके १५८१ मध्ये दासबोधाची रचना झाली पुढे सरसकट वर्णसंकर होणार आहे, अशा रीतीचे चराचरात सर्व रचले आहे. येथे एकाहून एक थोर आहे येथील विचार पाहता अंत लागत नाही. एक म्हणतात विष्णू थोर, एक म्हणतात रुद्र थोर, एक म्हणतात सगळ्यांमध्ये शक्ती थोर असे आपल्या परीने बोलतात, पण कल्पांताच्या शेवटी सर्व नष्ट होईल असे श्रुती बोलतात. आपापल्या उपासनेचा लोकांना अभिमान वाटतो पण खरे काय ते साधूविना कोणी जाणत नाही. साधू सांगतात आत्मा सर्वत्र व्यापक आहे बाकी सगळे मायिक चराचर आहे. चित्रांमध्ये सेना काढली त्यात कोण थोर आणि कोण लहान? हे तुम्ही विचारले तर त्याचा काही उपयोग नाही! स्वप्नामध्ये खूप काही पाहिले, लहानथोर अशी कल्पना केली पण जागे झाल्यावर काय झाले पहा. जागृतीचा विचार पाहिल्यावर लहानथोर कोणी राहत नाही, सगळी स्वप्नाची रचना होती असं लक्षात येतं. हा सगळा विचार आहे इथे लहानथोर कोणी नाही हे ज्ञानी माणसे सगळे जाणतात.
जो जन्माला आला तो मी थोर म्हणतच मेला, पण याचा विचार श्रेष्ठ जणांनी केला पाहिजे. ज्यांना आत्मज्ञान झाले तेच थोर महाजन, असे वेद-शास्त्रे-पुराणे आणि साधूसंतांनी सांगितले आहे. सर्वांमध्ये एकच परमेश्वर आहे त्यामध्येच हरि-हर होतात, जातात. खरा परमेश्वर निर्गुण निराकार आहे. तिथे उत्पत्ती, विस्तार, स्थान-मानाचा विचार नाही. नाम रूप स्थान मान हे सारे केवळ अनुमान आहे. त्याचा निर्णय ब्रम्हप्रलय झाल्यावरच होईल. ब्रह्म प्रलयापासून वेगळे आहे, ब्रह्म नावारूपापेक्षा निराळे आहे, ब्रम्ह सदा सर्वकाळ असते तसेच आहे. जे ब्रह्म जाणून त्याचें निरुपण करू शकतात तेच ब्रह्मविद्या जाणणारे ब्राम्हण असे जाणावे. इतिश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे ब्रह्मनिरूपण नाम समास चतुर्थ.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127