जे अक्षय सुखाने सुखावले, संसाराचे दुःख विसरळे, विषयापासून विरक्त झाले ते श्री रंग रंगात रंगले. त्यांना ईश्वर प्राप्त झाला. नरदेहाच्या बदली त्यांनी ईश्वर मिळवला. इतर लोकांनी मात्र करंटेपणाने नरदेहामध्ये समाधान मानले. अकस्मातपणे ज्यांनी आनंद निधान जोडले त्यांनी थोडक्या मोबदल्यात खूप काही मिळवले. इतर लोकांनी मात्र आयुष्य वाया घालवले. खूप तप केले त्यामुळे परिसाचा गोटा मिळाला पण तो करंटा असल्याने त्याचा उपयोग करता येत नाही. तसं संसारामध्ये आले, मायेमध्ये गुंडाळले गेले आणि शेवटी एकटेच हात झटकत निघून गेले.
या नरदेहाच्या संगतीने अनेक उत्तम गतीला पावले, इतर मात्र आता यातायातीमध्येच गुंतून पडले. नरदेहाचा लाभ घेऊन संत संग करून सार्थक करावे. पूर्वी नीच योनीमध्ये पुष्कळ दुःख भोगले, आता वेळ कशी येईल ते सांगता येत नाही. ज्याप्रमाणे पक्षी दाही दिशांना उडून जातात तसं हे वैभव सर्व कुठे निघून जाईल काही सांगता येत नाही. मूलबाळ बायका विरोधात जातील. आता वय निघून गेले, पाहिलेली घडी आपली नाही. मृत्यू आला तर नीच योनी मिळेल. श्वान, सुकर नीच योनीमध्ये दुःख भोगावे लागेल. तिथे काही उत्तम गती मिळणार नाही. पूर्वी गर्भवास भोगावा लागला त्यामुळे दुःख निर्माण झाले. तिथून मोठ्या कष्टाने कसातरी सुटला. आपल्या जीवाने दुःख भोगले, तरी त्याची सवय झाली नाही तसच पुढे एकटे जायला लागेल बाबा. कोणती माता, कोणता पिता, कोणती बहिण, कुठला भाऊ, कोणते नातेवाईक, कुठले बायको मुलं? येथे सगळे सुखाचे सोयरे आहेत. हे तुझ्या सुख-दुःखाचे सांगाती नाहीत. कोणता प्रपंच? त्याच्यासाठी व्याकुळ कशासाठी होतो? धनधान्य लक्ष्मी सगळ अशाश्वत आहे. कोणते घर? कुठला संसार? कशासाठी कष्ट करतोस? जन्मभर भार वाहिला, शेखी मिरवत राहिला. कोणते तारुण्य, कोणते वैभव? कोणते सोहळे, कोणते हावभाव, ही सर्व माया आहे रे! मायिक माया! रामाला रघुनाथाला अंतरशील, माझे माझे म्हणशील तर याच क्षणी मरून जाशील. तू पून्हा पून्हा जन्म घेतलेस, कितीतरी मायबाप, स्त्री, कन्या, पुत्र लक्ष लक्ष झाली. कर्मधर्मसंयोगाने सगळं मिळालं. एका ठिकाणी जन्माला आले, ते सगळे तू आपलं मानलं रे पढतमूर्खा!
हे शरीर देखील तुझे नाही तर इतरांचं काय? एक भगवंत फक्त आपला! पोटासाठी नाना नीच व्यक्तींची सेवा करावी, स्तुती करावी, स्तवन करावे, हे आता नको. त्याला काही मर्यादा ठेव. जो पोटाला अन्न दिवस देतो त्याच्यासाठी शरीर विकावा लागतं मग ज्याने आपल्याला जन्माला घातलं त्या देवाला कसं विसरतोस? ज्या भगवंताला रात्रंदिवस सर्व जीवांची चिंता लागलेली आहे, ज्याच्या सत्तेमुळे मेघ बरसतात, समुद्र मर्यादा धरतो, भूमी आपल्याला धारण करते, सूर्याच्या रुपाने प्रकट होतो अशी सगळी सृष्टी चालवतो असा जो कृपाळू देवाधिदेव! असा सर्वांचा आत्मा असणारा श्रीराम त्याला सोडून तू विषय, काम हाती धरतो? हा अधमपणा नाही का? रामा शिवाय जिजी आशा आहे ती ती निराशा जाणावी. माझे माझे म्हटले तर शेवटी शीणच उरेल हेच खरे.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127