२६ आक्टोबर रोजी पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी मला समजले की,आमच्या विल्ये गावचे लोकप्रिय आणि समाजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्त्व श्री. आझादभाऊ देसाई यांचे रात्री निधन झाले म्हणून. ही बातमी ऐकून काही वेळ मन सुन्न झालं.
आझादभाऊ यांचेबद्द्ल लिहावे, बोलावे तेवढे कमीच आहे. मी प्राथमिक शाळेत असताना आझादभाऊ आमच्या विल्ये गावचे सरपंच होते. त्यांनी राजकारणाचा समतोल राखताना उत्कृष्ट समाजकारण सुद्धा केलेलं मी पाहिले. शाळेत विविध कार्यक्रम असले की, आझाद भाऊ देसाई हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असत. त्यांचा उत्साह, त्यांच्या शरीरयष्टीकडे पाहून ते एखादे मिलिट्रीमॅन आहेत असं वाटत असे. भारदस्त आवाजात ते भाषण देत. उद्बोधक माहिती सांगत. चांगल्या गोष्टी कथन करत. नीटनेटक्या पोषाखात ते राहत असल्याने ते चारचौघात उठून दिसत.
१५ ऑगस्ट, २६ जानेवारी असली की दरवर्षी ते लेमनच्या गोळ्या उत्साहाने आमच्या शाळेत वाटप करत. जाकादेवी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना निवासी अभ्यास शिबीराच्या वेळी ते मोफत नाश्ता पुरवत. अनेकांना ते उदारहस्ते मदत करत. त्यांचे राजकीयही वजन होते. समाजकारणात त्यांना कमालीची अभिरुची होती.
विशेष म्हणजे विल्ये मांजरे तिठ्यावर, होणाऱ्या सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम काम केले. सार्वजनिक नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दिवंगत आझाद भाऊंनी विल्ये गावाच्या आसपास खेड्या पाड्यात आपल्या कर्तृत्वाने आपली लोकप्रियता उंचावली होती. दिवंगत आझाद भाऊ हे प्रख्यात हॉटेल व्यवसायिक, आंबा बागायतदार, ट्रान्सपोर्ट, खाणमालक अशी त्यांची यशस्वी ओळख होती.
अनेक क्षेत्रात त्यांचा वावर होता. जास्त काही लिहीत नाही. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर, वाडीवर, आमच्या गावावर आणि संपूर्ण पंचक्रोशीवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्या दुःखात मी आणि माझे कुटुंब सहभागी आहोत. दिवंगत आझाद भाऊ यांच्या पत्नी ( आमची काकी ), अमरदादा, अमिददादा, अमिताताई, रुचिराताई आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब या दुःखातून लवकरात लवकर सावरू दे.
आझादभाऊ देसाई साहेब हे आमच्या गावाचे आधारस्तंभ होते. आझादभाऊ देसाई आझाद या नावानुसार खरोखरच आझादी जीवन जगताना सर्वांच्या मनात आपलेपणा निर्माण केला. दिवंगत आझादभाऊ देसाई यांचा कार्यकाल कोणालाही विसरता येणार नाही.
पुन्हा एकदा दिवंगत आझाद भाऊ देसाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो.
-अमित उदय कांबळे, विल्ये(मुंबई)