(इंदूर)
दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३९९ धावांचा पाठलाग करताना कांगारूंची फलंदाजी भारतीय फिरकीसमोर ढेपाळली. पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियाला ३३ षटकांत ३१७ धावा करायच्या होत्या. मात्र त्यांंना २१७ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून अश्विन आणि जडेजाने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाकडून एबॉटने धावांची तर डेव्हिड वॉर्नरने ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र वॉर्नरला रविचंद्रन अश्विनने बाद करत कांगारूंना मोठा धक्का दिला. विशेष म्हणजे अश्विनची फिरकी निष्प्रभ करण्यासाठी डावखुरा डेव्हिड वॉर्नर उजव्या हाताने फलंदाजी करू लागला होता. मात्र त्याची ही डाळ अश्विनने शिजू दिली नाही. भारताकडून गोलंदाजीत रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. प्रसिध कृष्णाला दोन आणि मोहम्मद शमीला एक विकेट मिळाली.
भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने देखील चांगली सुरूवात करून दिली. त्याने दुसऱ्याच षटकात शॉर्ट आणि स्मिथला बाद केले. यानंतर वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करत संघाला अर्धशतकी मजल मारून दिली. मात्र पावसाच्या व्यत्ययानंतर पुन्हा खेळ सुरू झाल्यावर अश्विनने कांगारूंची मधली फळी उडवली.
त्याने वॉर्नरला ५३ धावांवर, मार्नस लाबुशेनला २७ धावांवर तर जॉश इंग्लिसला ६ धावांवर बाद केले. यानंतर जडेजाने दोन धक्के दिले तर ग्रीन १९ धावा करून धावबाद झाला. यानंतर शॉन एबॉटने झुंजार अर्धशतकी खेळी करत भारताचा विजय लांबवला. अखेर शमीने हेजलवूडला २३ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर पुढच्याच षटकात रविंद्र जडेजाने एबॉटलाही ५४ धावांवर बाद करत कांगारूंचा डाव २१७ धावात संपवला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमधली ही भारताची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सर्वोच्च धावसंख्या 383 धावा होती, जी त्यांनी नोव्हेंबर 2013 मध्ये बेंगळुरूमध्ये केली होती.