आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा समावेश करण्यात आला असून जखमी अक्षर पटेलच्या जागी त्याला १५ सदस्यीय संघात संधी मिळाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी ही मोठी घोषणा केली.
अक्षर पटेल दुखापतीतून सावरू शकलेला नाही. 15 सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या आशिया कप-2023 सामन्यात तो जखमी झाला होता. यासह अक्षरचे वनडे विश्वचषक खेळण्याचे स्वप्नही भंगले आहे. अश्विन याआधीच संघासह गुवाहाटीला गेला आहे, जिथे तो 30 सप्टेंबरला सराव सामन्यात इंग्लंड विरुद्ध खेळण्याची शक्यता आहे.
अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत संधी मिळाली होती. ज्यामध्ये त्याने दमदार कामगिरी केली. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 3 बळी घेतले. मोहालीतही 1 बळी मिळवण्यात त्याला यश आले. अशाप्रकारे त्याने या मालिकेत 2 सामने खेळले आणि 4 बळी घेतले. विशेष म्हणजे अश्विनने तब्बल 20 महिन्यांनंतर या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले आणि त्याने आपल्या फिरकीची जादू दाखवून दिली. अखेर अक्षर दुखापतीतून सावरू शकला नसताना अश्विनला वर्ल्डकपचे तिकीट मिळाले आहे.
अश्विनला 115 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर 155 विकेट्स घेतल्या आहेत. तर, 94 कसोटी सामन्यांत 489 आणि 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 72 विकेट घेतल्या आहेत.
R Ashwin replaces injured Axar Patel in the 15-member squad.
We wish Axar a speedy recovery 👍 👍#TeamIndia's final squad for the ICC Men's Cricket World Cup 2023 is here 🙌#CWC23 pic.twitter.com/aejYhJJQrT
— BCCI (@BCCI) September 28, 2023