भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार तथा माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचे कर्करोगाच्या आजाराने शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास अकोल्यात निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. अकोल्यातून सलग २९ वर्षे त्यांनी भाजपचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
अकोला पश्चिम मतदार संघातून सातत्याने निवडून येणारे गोवर्धन शर्मा हे लोकांमध्ये रमणारे, जनमाणसांशी नाळ जुळलेले नेते होते. राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असे त्यांचे नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने जुन्या आणि नव्या पिढीशी उत्तम संपर्क, समन्वय असलेला लोकप्रतिनिधी हरपला आहे. भाजप वाढविण्यात आमदार गोवर्धन शर्मा यांचा मोठा वाटा होता.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार गोवर्धन शर्मा यांनी सलग सहा वेळा विजय मिळवला होता. सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने ते कार्यरत होते. गोवर्धन शर्मांना गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने ग्रासले होते. जवळपास १५ दिवसांपूर्वी त्यांना मुंबई येथून अकोला येथील त्यांच्या घरी आणले होते. काल रात्री प्रकृती चिंताजनक होऊन त्यांचे निधन झाले. त्यांच्या घरी हितचिंतकांची एकच गर्दी झाली आहे. त्यांच्या मागे पत्नी, कृष्णा व अनुप ही दोन मुले, सून, नातवंडासह मोठे आप्त परिवार आहे.
नागरिकांच्या अनेक समस्या निराकरणासाठी कटिबद्ध असणारे आमदार शर्मा लोकांसाठी सदैव २४ तास उपलब्ध असत. कधीही जवळ मोबाईल न ठेवता लोकांची थेट आठवण ठेवणारे, अशी त्यांची ओळख होती. विठ्ठल मंदिराच्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे तसेच अयोध्या येथील शीला पूजन १९९५ पासून ‘श्रीराम जन्मभूमी’ आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. लोकनेते आणि राम भक्त म्हणून ते प्रसिद्ध होते.