(मुंबई/किशोर गावडे)
सन १९७७ साली स्थापन झालेल्या भांडुपच्या उत्साही मित्र मंडळाने त्याच वर्षापासून नवरात्रोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. आजही त्याच जोमानं, जिद्दीने सर्वांच्या सहकार्याने मागची ४५ वर्षाची ही परंपरा सुरु ठेवली असून, ह्यावर्षी ह्या दुर्गामाता उत्सवाचे ४६ वे वर्ष आहे.
कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत संस्था म्हणून भांडुप येथील उत्साही मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाची ओळख आहे. नवनवीन चित्तवेधक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे, स्थानिक कलाकारांनी सादर केलेली अप्रतिम नाटके, एकांकीका व सांस्कृतिक कार्यक्रम ह्या उत्सवाचा अविभाज्य भाग असून भजन, किर्तने , पारायणे इ. कार्यक्रमही उत्सवामध्ये यशस्वीतेने पार पाडले जातात, अशी माहिती मंडळाचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश अमीन व पदाधिकारी यांनी दिली.
मंडळाचे ४६ वे वर्ष असल्याने संपूर्ण उत्सवात यावेळी नानाविविध कार्यक्रमांची शिस्तबद्ध पद्धतीने रेलचेल असणार आहे. याची सुरुवात उत्साही मित्र मंडळ (भांडुपची आई) दुर्गादेवीच्या आगमन मिरवणुकीने झाली. ढोलताशा पथकाच्या साथीने श्री दुर्गादेवीचे जल्लोषात आगमन करण्यात झाले. ढोलताशांचा गर्जनाद, त्याच्यासोबत साथीने नाचणारे भगवे झेंडे आणि सभासदांचा अमाप उत्साह यामुळे ही मिरवणूक संस्मरणीय ठरली. आगमन मिरवणूकीत सुद्धा सर्व धर्मियांचा सहभाग दिसून आला, हे विशेष वैशिष्ट्य होय. आगमन मिरवणूकीत कोकण नगरातील नव्हे तर संपूर्ण भांडुपकर भक्त, सर्व युवक युवतींनी पारंपारिक वेशात भाग घेतला होता. तसेच ढोल, ताशा व लेझीमच्या गजरात नृत्ये करत आगमन मिरवणूकीची शोभा वाढवली.
या वर्षीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधे एकांकीका सादर करण्यात येणार असून स्थानिक मंडळे कलाप्रेमी एकांकीका सादर करणार आहेत. त्याचबरोबर वाद्यवृंद संगीताचा कार्यक्रम सादर करणार असून रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिलासाठी देखील वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सुश्राव्य भजने, किर्तन व स्थानिक कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच गरबा नृत्याचा आस्वादही भाविकांना या उत्सवा दरम्यान घेता येणार आहे.
श्री. भरत गावडे यांच्या अध्यक्षतेखाली १९७७ साली सुरु झालेल्या उत्साही मित्र मंडळाचे अध्यक्षपद सर्वश्री श्रीधर मोरे, श्री. प्रशांत सुकाळे इ. व इतर मान्यवरांनी भुषविले असून सध्या श्री. विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी मंडळात सर्वधर्मीय कार्यकर्त्यांचा समावेश आहे. अशा सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या या उत्सवासाठी उत्साही मित्र मंडळाने सर्व भाविकांना आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.