(वेळणेश्वर / उमेश शिंदे)
वेगावर नियंत्रण न राहिल्याने भरधाव चारचाकी वाहनाने रस्त्यालगत असणाऱ्या कलिंगड स्टाँलला उडवून व दिवाळावर आदळून झालेल्या अपघातात गाडीतील दोन किरकोळ जखमी तर दोन बालके वाचली. शृंगारतळी-गुहागर मार्गावरील पाटपन्हाळे साळवी स्टाँप येथे पहाटे ५.३० वाजता हा अपघात घडला.
गुहागर तालुक्यातील पालकोट येथील वेद्रे कुटुंबिय मुंबईहून आपल्या पालकोट गावाला पालखीसाठी येत होते. तत्पूर्वी ते पाटपन्हाळे कोंडवाडी येथील नातेवाईक विलास पागडे यांच्याकडे फ्रेश होण्यासाठी जाणार होते. शृंगारतळी- गुहागर दरम्यान, पाटपन्हाळे साळवी स्टाँप येथे गाडी आली असता चालकाचे वेगावर नियंत्रण न राहिल्याने येथील रस्त्याच्या विरुध्द दिशेला असलेल्या कलिंगड स्टाँलवर आदळून चारचाकी वाहन दिवाळावर आपटले. या अपघातात वेद्रे कुटुंबियातील एक महिला व एक पुरुषाला किरकोळ दुखापत झाली. विशेष म्हणजे एक लहान बालक व एक लहान मुलगी बालंबाल बचावली. अखेर पाटपन्हाळे सरपंच विजय तेलगडे यांनी मध्यस्थी करुन नुकसानग्रस्त स्टाँलधारक व प्रगतशील शेतकरी तुकाराम तेलगडे यांना त्यांच्या स्टाँलची भरपाई चालकाकडून देण्याचे मान्य केले व हा वाद मिटवला.
दरम्यान, प्रगतशील शेतकरी तुकाराम तेलगडे हे दरवर्षी कलिंगडाचे पीक घेतात आणि रस्त्यालगत स्टाँल लावून कलिंगड विक्री करतात. मात्र, त्यांचा संपूर्ण स्टाँलच जमीनदोस्त झाल्याने त्यांचे ५० हजाराचे नुकसान झाले.