(मानसिक संतुलन – भाग ११)
प्रत्येकास आपल्या आयुष्यात कशानाकशाची भीती वाटत असते. कुणी झुरळाला घाबरते कुणी पालीला घाबरते. कुणाला रस्त्यावरील वाहनांची भीती वाटते. तर कुणाला उगीच मागेपुढे कुणी उभा आहे असा भास होतो. घाबरणे ही मनुष्यच नव्हे तर साऱ्या जिवमात्राची स्वाभाविक प्रवृती आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सर्वच जीव प्रयत्न करतात. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु विनाकारण ज्यावेळी मनात भीतीची भावना निर्माण होत असेल, तर मात्र तो एक मानसिक आजार ठरतो. या आजाराची तीव्रता वाढली की त्याचे रूपांतर भयगंडात होते. त्यास इंग्रजीत फोबिया हा शब्द आहे.
सांताक्रुझ योग इन्स्टिट्युट ला असताना एका मजेदार किस्सा अनुभवास आला होता तो असा, मानसिक आजाराने ग्रस्त अनेक महिला गुरुमाँ हंसाबेन यांना भेटण्यासाठी येत असत. एकदा सकाळीच एक बाई त्यांना भेटण्यासाठी आली. त्यावेळेस हंसाबेन मॉर्निंग वॉक करीत होत्या. आपल्यासोबत तिलाही चालायला सांगून दोघीही फिरू लागल्या. ती म्हणाली, “हंसाजी, मला की नाही पालींची खूप भीती वाटते. आमच्या घरात खूपच पाली झाल्या आहेत. मी काय करू?” हंसाबेन काही बोलणार इतक्यात ती एकदम किंचाळून एका ठिकाणी बोट दाखवत म्हणाली ” ती बघा पाल”. खरेच तिथे पाल होती आणि ती दोन दोन पावलावर पाल दाखवू लागली. हंसाबेनला प्रथमच कळले की योगा इन्स्टिट्यूटमध्ये इतक्या पाली आहेत.
एखाद्या गोष्टीचा धसका घेतला की ती समोर प्रकट होतेच. ‘भित्यापाठी ब्रह्म राक्षस’ म्हणतात ते यामुळेच. वरील त्याचे उत्तम उदाहरण होय. कारण आपण त्या गोष्टीचा धसका घेतो. आणि तिलाच शोधत राहतो. ही एक मनोविकृती आहे. त्यासाठी आपल्या विचारांमध्ये सुधारणा घडवून आणावी लागेल. परंतु हे सोपे नाही. याची सुरवात कुठेतरी खोल, खूप आधी झालेली असते. त्याचे रूपांतर नंतर सवयीत होते. आणि घाबरणे ही एक सहज क्रिया बनते.
या सर्वांचे मूळ, पहिला क्लेश जो अविद्या हा आहे. जीवनाविषयी अज्ञान जोपर्यंत नाहीसे होत नाही तोपर्यंत ह्या कलेशावर विजय मिळवणे कठीण आहे. मुळात जन्म झाल्यावर जीव स्वतःच्या अस्तित्वास सत्य मानतो. व त्यावरच स्वतःचे विश्व उभे करतो. आपला देहच त्याचे सर्वस्व बनते. हे अस्तित्व कायम रहावे असे त्यास वाटत राहते. यातून केवळ अज्ञानीच नाही तर ज्ञानी माणूस ही सुटत नाही. जो साधू आहे, ज्याने जीवन सत्य जाणले आहे असा ज्ञानीही संकट आल्यास स्वतःस वाचवण्याचा प्रयत्न करतो. योगाची प्रॅक्टिस केल्यास किंवा विशिष्ट पद्धतीने भक्ती केल्यास काही अंशी ही भीती कमी होते. विशिष्ट धेय्याने प्रेरित झालेली माणसे मृत्यूचे भय बाळगीत नाहीत. उदाहरणार्थ सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला आपल्याला लढतांनाच विरमरण यावे असे वाटते. पाणिनी सारखे ऋषी मृत्यूला सहज कवटाळतात.
आपल्या शिष्यांना व्याकरण शिकवताना व्याघ्र म्हणजे वाघ ह्या शब्दाभोवतीचे वलय समजावून सांगताना पाणिनी अगदी तन्मय होऊन गेले होते. समोर शिष्यही देहभान हरपून ते श्रवण करीत होते. तितक्यात समोरच्या झाडीतून खरोखरच वाघ त्यांच्यासमोर आला. त्या हिंस्त्र प्राण्याला पाहताच शिष्यांची बोबडी वळली. मिळेल त्या वाटेने शिष्य पळून गेले. पाणिनी मात्र त्या वाघाला बघून अत्यंत प्रसन्न झाले. त्यांच्या चक्षूनी कल्पना केलेला वाघ प्रत्यक्ष पाहून त्यांचे हृदय उचंबळून आले. त्याचे रसभरीत वर्णन करण्यात ते अगदी मग्न झाले. परंतु त्या हिंस्त्र श्र्वापदाला ते कसे कळावे. त्याने त्यांच्यावर झेप घेऊन त्यांचा प्राण घेतला. हसत मुखाने आपल्या मृत्यूला सामोरे जाणारी अशी उदाहरणे आपल्याला इतिहासात दिसतील. ही, अभिन्वेष ह्या क्लेशावर विजय मिळवल्याची उदाहरणे आहेत. अलीकडील स्वातंत्र्ययुद्धात हसत हसत फासावर गेलेले क्रांतिकारक त्या वेळेपुरते तरी मृत्यूच्या भयातून मुक्त झाले होते.
सामान्य माणूस मात्र नित्य भीतीच्या छायेखालीच जगत असतो. कधीतरी शांत बसून आपल्याला वाटणाऱ्या भितींची एक यादी बनवावी.
• त्यात भीतीचे कमी प्रमाण असलेल्या बाबी वर घ्याव्यात.
• सर्वात कमी असलेली भीतीचे कारण शोधावे.
• ती वाटू नये म्हणून काय उपाय योजना करता येईल ते पाहावे.
• याचा रोजच्या रोज आढावा घ्यावा.
असे केल्याने भीतीचे प्रमाण खूप कमी होते. बऱ्याच वेळा आपण जे घाबरतो त्याचे कारण काय, हेच कळत नाही. कोणतीतरी अनाहुत भीती आत कुठेतरी दडी मारून बसलेली असते. नेमकी महत्वाच्या प्रसंगी ती उसळून बाहेर पडते. आणि त्यामुळे आपले नुकसान होते. हंसाबेन हा मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने समजावतात.
दैनंदिन जीवन जगत असतांना आपल्या मनाविरुद्ध लहान मोठ्या अनेक घटना घडत असतात. बऱ्याच वेळा त्या सहन कराव्या लागतात. हळव्या मनावर त्या आघात करतात. कुणी विचारल्यास ‘काही नाही झाले’ असे सांगून आपण मोकळे होतो. परंतु हृदयात आत कुठेतरी लहानसा घाव होतोच. तो घाव काढून टाकण्याचे तंत्र जर अवगत नसेल तर तो अंतर्मनात बाॅटलींग होतो. मनास लागणारे असे प्रसंग वारंवार येत गेल्यास ही बाटली एक दिवस भरते व ब्लास्ट होते, फुटते. आणि ती व्यक्ती एकदम डिप्रेशन मध्ये जाते. अलीकडे येणारा मानसिक तणाव किंवा हुरहूर अशा प्रकारची आहे. अशा मानसिक तणावाचे कारण लगेच सांगता येत नाही. त्यासाठी हळूवार नियमित प्रयत्न करावे लागतात. योगाभ्यास सुरू करताच महिन्याभरात नेमके कारण कळते व साधारण तीन महिन्यात अशी व्यक्ती स्ट्रेस मधून बाहेर पडते.
येणाऱ्या संकटापासून किंवा मरणापासून स्वतःला वाचवण्याची जी जीवास उर्मी होते याचा अर्थ हा प्रसंग याआधी आपल्या वाट्यास आला आहे याची खात्री पटते. अन्यथा मृत्यू जर आपण अनुभवलाच नसेल तर घाबरण्याचे कारण काय? त्यातूनच जाणकारांनी पुनर्जन्माची कल्पना मान्य केली असावी. अभिन्वेष या क्लेशाची निर्मिती यातूनच होते. हा आपल्यावर झालेला एक नकारात्मक संस्कार होय. क्रांतीकारकांचे हसत हसत फासावर जाणे त्या वेळच्या प्रसंगानुरूप एक उत्कट भावनेचा भाग आपण समजू शकतो. परंतु असे कोणतेही उद्दीपन नसतांना समोर मृत्यू उभा ठाकल्यास पाणिनी सारखे ऋषी त्यास शांतपणे सामोरे जातात. यासाठी आपल्या आतील मृत्यूच्या भयाची जी संस्कार बीजे आहेत ती दग्ध केल्याशिवाय पर्याय नाही हेच सत्य आहे. यादृष्टीने पाहिल्यास क्रांतीकारकांचे फासावर जाणे आणि पाणिनी ऋषींनी स्वतःस वाघाच्या हवाली करणे ह्या समान गोष्टी नाहीत. क्रांतिकारकांचे हुतात्म्य एका विशिष्ट बाह्य घटकांमुळे निर्माण झाले. परंतु ऋषींचे वाघाच्या तावडीत स्वतःस देणे म्हणजे त्यांनी मृत्यूवर मिळवलेला विजय होय. म्हणजेच अभिन्वेष या क्लेशाचे त्यांनी केलेले समूळ उच्चाटन होय.
पतंजली त्यासाठीच आपल्या ग्रंथाची रचना वैशिष्ट्यपूर्ण करतात. द्वितीय साधनापादामध्ये त्यांनी बहिरंग योग विषद केला आहे. त्यात प्रत्याहार पर्यंत अनेक योग तंत्रे सांगितली आहेत. त्यातुन शरीरची सर्वांगाने शुद्धी झाली की अंतरंग योगातील समाधी अवस्था कशी गाठायची याचे विश्लेषण ते करतात. अंतर्मनातील एकावर एक असलेले पदर हळूवार उलगडत खोलवर दबा धरून बसलेली संस्कार बीजे जाळून टाकायची तंत्रे समजावून सांगायचा प्रयत्न करतात. अर्थात ही प्रक्रिया म्हणावी तेवढी सोपी नाही. दिवसातून किमान ३ तासाचा योगाभ्यास आणि किमान १२ वर्षाचा कालखंड ते सांगतात. आजच्या इन्स्टंट जगात ” किती दिवसात योग शिकता येईल?” असा प्रश्न विचारणाऱ्यांची योगाकडे बघण्याची दृष्टी या दृष्टीने फारच संकुचित वाटते. वर वर पाहता मानसिक तणावाची कारणे सोपी वाटतात. परंतू त्याचा नीट शोध घेतल्यास याची मुळे अंतर्मनात खोल रुजलेली असतात हे आपण समजून घेतले पाहिजे. शरीर व मनाचा अशा पद्धतीने खोलवर अभ्यास करणे गरजेचे आहे.
– दिनेश पेडणेकर, योग शिक्षक (मंडणगड)
मोबाईल 9420167413