(रत्नागिरी)
रत्नागिरीचे रंगकर्मी आणि प्रतिभावान लेखक (कै.) अविनाश फणसेकर यांनी लिहिलेल्या ‘भगवान गौतम बुद्ध’ या नाटकाच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्या हस्ते झाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील ग्रंथाली प्रतिभांगण येथे हा कार्यक्रम उत्साहात झाला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आनंदराव खरात आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
या निमित्ताने गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करणारी सुरेश भट या गझल सम्राट कवीनी लिहिलेली आणि पं. यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली गीते अनन्या गोखले आणि योजना शिवानंद यांनी सादर केली. त्यानंतर योजना शिवानंद यांनी याच नाटकात ४० वर्षांपूर्वी साकारलेली यशोधरा ही भूमिका रसिकांना व्हिडियोद्वारा दाखविण्यात आली.
विचारवंत, प्रतिभावान साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील अप्रतिम भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली. आनंदराव खरात, मराठीच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. मीना गोखले यांनीही मनोगत व्यक्त करताना या उपक्रमाचे कौतुक केले. सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले.
जगाला अहिंसा आणि शांततेचा महान संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या जीवन तत्त्वज्ञानावरील ही नाट्यकृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथावर आधारित आहे. या नाटकाच्या पुस्तकाला लेखक प्रल्हाद जाधव यांनी प्रस्तावना लिहिली. या नाटकाच्या निर्मितीतील रत्नागिरीतील कलाकार त्रयीला म्हणजे योजना प्रतिष्ठानचे संस्थापक अशोकराज भाट्ये, लेखन – संकल्पना करणारे अरुणोदय भाटकर आणि लेखक अविनाश फणसेकर यांच्या स्मृतीला ही नाट्यकृती अर्पण करत असल्याचे योजना शिवानंद यांनी सांगितले. या सोहळ्याला बँक ऑफ इंडिया आणि एनकेजीएसबी को ऑपरेटिव्ह बँकेचे सहकार्य लाभल्याबद्दल आणि विविध मान्यवरांचे सहकार्य लाभल्याबद्दल आणि रत्नागिरीतील सर्व प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांचे आभार मानण्यात आले.
फोटो: भगवान गौतम बुद्ध या नाटकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करताना साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार. डावीकडून गायिका योजना शिवानंद, आनंदराव खरात आणि सुदेश हिंगलासपूरकर.