(फुणगूस / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था आणि दादासाहेब सरफरे विद्यालय व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे संचालक सचिन मोहिते यांची संगमेश्वर तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा संस्थेचे उपाध्यक्ष राजाराम गर्दे यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन संस्थेतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव शरद बाईत, संचालक दिनेश जाधव, मुख्याध्यापक प्रकाश विरकर, पर्यवेक्षक महावीर साठे, निवृत्त वरिष्ठ लिपिक दिलीप म्हैसकर उपस्थित होते. यावेळी संगमेश्वर तालुका प्रेस क्लबचे सचिव निलेश जाधव, खजिनदार सुरेश करंडे, सल्लागार प्रमोद हर्डीकर, सल्लागार अमृतराव जाधव, सदस्य प्रा. दीपक भोसले यांचाही संस्थेतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना सचिन मोहिते म्हणाले की, पत्रकारिता क्षेत्रात आल्यानंतर आपण अनेक सामाजिक प्रश्न हाती घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न केला. तसेच वंचित घटकाला न्याय देण्यासाठी नेहमी पाठपुरावा केला यापुढे देखील संघटनेच्या पदाधिकारी व सर्व सदस्यांना सोबत घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासणारे काम केले जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी प्रमोद हर्डीकर, अमृतराव जाधव यांनी सरफरे विद्यालयाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात संस्था उपाध्यक्ष राजाराम गर्दे म्हणाले कि, पत्रकारितेमध्ये स्पर्धा वाढली आहे. आपण साऱ्यांनी निरपेक्ष भावनेने करत असलेले काम असेच पुढे सुरू ठेवा असे सांगून आमच्या संस्थेचा सदस्य सचिन हा माजी विद्यार्थी असून त्याची संंगमेश्वर तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाली ही संस्थेसाठी अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. असे सांगून सचिनच्या पाठीमागे संस्था खंबीरपणे उभी राहील, असे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक सुहास गेले यांनी केले.