(रत्नागिरी)
जिल्ह्यात गुरुवारी पावसाने संततधार सुरू ठेवल्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. गावातील ठिकठिकाणच्या ओढ्यांनाही प्रचंड पाणी आले आहे. काही ठिकाणी ओढे रस्त्यावरून ओसंडून वाहत असल्याचे समजते. यातच मुंबई गोवा महामार्गावरील बावनदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने पुल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे, अशी माहिती सरपंच तन्वी कोकजे यांनी दिली आहे.
पुलाजवळ पोलिस पाटील, ग्रामसेवक पाचवे, सदस्य अक्षया तोडकर, पूजा सुर्वे, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन रावनंग, मोहन सावंत, विद्या शेवडे, राहुल सावंत, विष्णू पवार, संकेत कारकर, सागर बाईत, सिधर्ष करकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांकडून पुलासंदर्भात बावनदी आसपासच्या नागरीकांना देखील कल्पना देण्यात आली असून पुलावरून मोठ्या गाड्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर छोट्या गाड्या चालू ठेवण्यात आल्या आहेत. पावसाचा जोर कमी झाला नाही तर काही तासात पूर्ण वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
दरम्यान चिपळूण येथील वाशिष्ठी, संगमेश्वरमधील शास्त्री, सोनवी आणि बावनदी तसेच लांजातील काजळी, मुचकुंदी, राजापूरातील कोदवली या प्रमुख पाच नद्यांनी बुधवारी रात्री इशारा पातळी ओलांडली असल्याने त्याठिकाणी देखील पुरदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.