राज्यात लाॅकडाऊनचे नियम कडक करण्यात आले असुन यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहे, मात्र असे असतानाही अनेकजण बनावट ओळखपत्राद्वारे लोकल प्रवास करत असताना आढळून आले आहेत. तसेच काहींनी विनातिकीट प्रवासाचा प्रयत्न मध्य रेल्वेवर केल्याचे उघडकीस आले. तिकीट तपासनीस व रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात हे प्रवासी अडकले. यावेळी मध्य व पश्चिम रेल्वेतून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा असल्याने त्यांनाच स्थानकात प्रवेश देण्यासाठी रेल्वे पोलीस व कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
गुरुवारी रात्रीपासून केंद्र व राज्य सरकारबरोबरच वैद्यकीय कर्मचारी आणि वैद्यकीय उपचारांसाठी जाणाऱ्यांनाच मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. शुक्रवार सकाळपासून याची कठोर अंमलबजावणी सुरू झाली. त्यानुसार बहुतांश स्थानकांतील पूर्व व पश्चिमेकडील प्रत्येकी दोन ते तीन प्रवेशद्वारेच सुरू ठेवण्यात आली. शिवाय जनसाधारण तिकीट सेवा, मोबाइल तिकीट सेवा व एटीव्हीएम सेवा बंद करण्यात आली. जेणेकरून या सेवांमधून तिकीट मिळवून अन्य प्रवासी प्रवास करू शकणार नाहीत. शुक्रवारी स्थानकात प्रवेशद्वारांजवळच लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच तिकीट तपासनीसही तैनात होते. ओळखपत्र व तिकीट पाहूनच प्रवाशांना स्थानकांमध्ये प्रवेश दिला जात होता.
सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासास परवानगी नसल्याने काही मंडळींनी अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचे बनावट ओळखपत्राद्वारे प्रवास करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. अशा प्रवाशांना मध्य रेल्वेच्या तिकीट तपासनीसांनी पकडले असुन आतापर्यंत २५ प्रवाशांकडून बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहेत.