(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरानजीकच्या एमआयडीसी येथील बँक ऑफ इंडियामध्ये बनावट दागिने ठेवून संगनमताने बँकेची सुमारे ४९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली. यातील १० संशयितांपैकी अन्य तीन संशयितांना ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना १ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या तिघांनाही कारवांची वाडी येथील बँकेत अशाच प्रकारे फसवणूक केल्यानंतर आता या प्रकरणात वर्ग करण्यात आले आहे.
बँकेतील सोनार प्रदीप श्रीपाद सागवेकर (५१, रा. कीर्तीनगर, रत्नागिरी), आकाशानी जनार्दन कांबळे (५०), शुभम जनार्दन कांबळे (२४, दोन्ही रा. रवींद्रनगर कारवांचीवाडी, रत्नागिरी) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
या पूर्वी नमिता दिगंबर इंदुलकर (५०, मूळ रा. राजापूर सध्या रा. कोकणनगर, रत्नागिरी) आणि तबन्ना सिध्दप्पा बसनाल (मूळ रा. विजापूर सध्या रा. कोकणनगर, रत्नागिरी) यांना पोलिसांनी अटक केली होती. दि. २७ जुलैपर्यंत त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.