(देवरूख / सुरेश सप्रे)
महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांची आम. शेखर निकम यांच्या पाठपुराव्याने कामाची स्थगिती उठवली, म्हणूनच न. पं. ला कोट्यावधीचा निधी मिळाला. फुकाचा टेंभा मिरवून जनतेची दिशाभूल करू नये, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष हनिफ हरचिरकर यांनी दिला आहे.
ठोक निधीतून फडणवीस सरकारने नगरपंचायतीस १ कोटी ३० लाख दिले, हे म्हणणे म्हणजे ज्या लोकप्रतिनिधींनी पक्षीय राजकारण न करता, जनतेच्या अडचणी लक्षात घेत विकास व्हावा म्हणून पाठपुरावा करून निधी आणला याबाबत माहीत असतानाही आपल्या राजकीय फायद्यासाठी त्यांना कमी लेखणेचा प्रकार कुणीही करू नये, असा घणाघात शहर अध्यक्ष हनिफ हरचिरकर यांनी केला. कुठलाही निधी कुणी व कसा मंजुर केला, तो निधी कशातून आला व त्यासाठी लोकप्रतिनिधींनी काय केले, हे पाहून, खातरजमा करूनच नंतर क्रेडीट घ्यावे. कोणीतरी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आमच्यामुळे कामे मंजूर झाली असे म्हणणे पुर्ण चुकीचे आहे.
२०२१-२२ च्या आर्थिक वर्षात कामे मंजूर आहेत, ती आम. शेखर निकम यांनीच लोकप्रतिनिधी म्हणून राजकारण न करता, पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनच कामे विविध निधीतून मंजूर करून घेतली व तीच कामे टेंडरला आहेत. आम. निकमांनी देवरूख नगर पंचायतीची विविध कामे महाविकास आघाडी सरकारचे काळात अर्थमंत्री अजित पवारांकडे पाठपुरावा करूनच बजेटमध्ये आली आहेत.
सरकार बदलल्याने अनेक कामांना स्थगिती दिली गेली. त्यातील ज्या कामांचे कार्यारंभ आदेश दिले ती कामे सुरू करावीत असे नवीन सरकारने आदेश दिल्याने काही कामे सुरू झाली. बाकीच्या कामांना मंजुरी असून कार्यारंभ आदेश नसल्याने सरकारने ती स्थगित केली होती. ती उठविणेसाठी आम. निकम यांनी पक्षीय राजकारण न करता लोकप्रतिनिधी म्हणून आपली जनतेशी असलेल्या बांधिलकीतून नवीन सरकारमधील संबधीत मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. म्हणूनच स्थगिती उठवून त्या कामांना पुर्वी मंजूर असलेला निधी दिला, ही वस्तूस्थिती आहे.
तेव्हा आपले सरकार आले म्हणजे नुसती निवेदने देवून निधी मिळत नसतो. काम सुरू वा मंजूर झाले की, असे काही मग आमचेमुळेच झाले अस जाहीर करून अनेकजण क्रेडीट घेतात. ते लोकप्रतिनिधी वा संघटना वा पक्ष कोणी असोत, मात्र त्यांनी अशा बतावण्या करताना याबाबतची सर्व माहीती घेणे गरजेचे आहे. तसेच सोशल मिडीयावर आलेली माहिती घेऊन बातमी करणेही चुकीचे असल्याचे तसेच या बाबत खातरजमा करण्याची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.