फिफा वर्ल्ड कपला काल रविवारपासून सुरुवात झाली आहे. सलामीचा सामना अल खोर येथील अल बायत स्टेडियमवर यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात खेळला गेला. पुढील २९ दिवस चालणाऱ्या या मेगा इव्हेंटमध्ये ६४ सामन्यांचा थरार रंगणार आहे. तर १८ डिसेंबरला फुटबॉल जगताला नवा चॅम्पियन मिळणार आहे.
संपूर्ण फिफा विश्वचषकात वितरित करण्यात येणारी बक्षीसाची रक्कम ४४० दशलक्ष डॉलर (सुमारे ३५८५ कोटी रुपये) निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये विश्वचषक विजेत्या संघाला वर्ल्डकप ट्रॉफीसह ४२ मिलियन डॉलर (सुमारे ३४२ कोटी रुपये) मिळतील. गेल्या म्हणजेच २०१८च्या विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत ही रक्कम ४ दशलक्ष डॉलर्सनी अधिक आहे.
विजेत्या संघाला ३४२ कोटी रुपयांसोबतच १८ कॅरेट सोन्याची वर्ल्ड कप ट्रॉफी देखील मिळणार आहे. ही ट्रॉफी शुद्ध सोन्यापासून बनलेली आहे आणि तिची किंमत ऐकून डोळे विस्फारून जातील.
फिफा वर्ल्डकप ट्रॉफी प्रसिद्ध इटालियन कलाकार सिल्व्हिया गझानिगा यांनी डिझाइन केली होती. ही ट्रॉफी सर्वप्रथम १९७४ च्या विश्वचषक विजेत्या संघाला प्रदान करण्यात आली. ट्रॉफी ३६.८ सेमी उंच आणि १८ कॅरेट सोन्याची आहे. या ट्रॉफीचे एकूण वजन ६ किलो १७५ ग्रॅम आहे. ट्रॉफीच्या खालच्या भागात मॅलाकाइटच्या दोन हिरव्या पट्ट्या दिसतात. या ट्रॉफीची किंमत १५०००० डॉलर (जवळपास १ कोटी २ लाख रुपयांपेक्षा जास्त) आहे. इतकी महाग ट्रॉफी असल्याने विजेत्या संघाला या ट्रॉफीची सोन्याची प्रतिकृती दिली जाते.
दरम्यान, १९७० पर्यंत विश्वचषक विजेत्या संघाला FIFA द्वारे ज्युल्स राईम ट्रॉफी प्रदान करण्यात येत होती. १९७० मध्ये जेव्हा ब्राझीलने तिसऱ्यांदा (१९५८, १९६२ आणि १९७०) वर्ल्डकप जिंकला. तेव्हा त्यांना ज्युल्स राईम ट्रॉफी कायमची देण्यात आली.