(रत्नागिरी)
राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना हिरवा कंदील दाखवला आहे. ३० जून, २०२३ रोजी बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांना ऑनलाइन संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. पात्र शिक्षकांनी बदलीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. गत शैक्षणिक वर्षी याच विषयावरून मोठा गदारोळ झाला. शिक्षक भरती झालेली नसतानाही पुन्हा जिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे केल्या जातात. जे शिक्षक बदलीस पात्र आहेत. त्यांच्याकडून आंतर जिल्हा बदलीसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच सन २०२२मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते. परंतु, ही प्रक्रिया राबवत असताना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यास पात्र असूनही रिक्त जागेअभावी त्यांना बदली मिळाली नव्हती, अशा शिक्षकांना सन २०२२मध्ये भरलेल्या अर्जाचे संपादन करण्याची संधी देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्षामध्ये ७२५ शिक्षक आंतर जिल्हा बदलीने अन्य जिल्ह्यात गेले. २५ टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त असतानाही केवळ शासनाच्या आदेशामुळे त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यावेळी जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांचा विचार न करताच त्या शिक्षकांना सोडण्यात आल्याने सुमारे १,९१४ शिक्षकांची पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र, हे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात ७०० शिक्षकांची तात्पुरती अल्प मानधनावर नियुक्त्या करण्यात आली आहे.
शिक्षक भरती अद्याप करण्यात न करताच अनेक जागा रिक्त असतानाही आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांना अर्ज भरण्याचे आदेश शासनाने दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.